कोल्हापूर : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली.
कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण तसेच वैद्यकीय बिले यांच्या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी का होत नाही, असा प्रश्न करत रुग्णांची वाढ थांबविण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.
शहरातील सरसकट दुकाने उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता प्रशासन व नागरिकांनीही घेतली पाहिजे. कोरोना रुग्ण घरीच अलगीकरण आहेत. अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. हे रुग्ण बऱ्याच ठिकाणी फिरत असल्याने शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनाला आणून दिले.
प्रशासनाने निर्बंध कडक करावेत, गृह अलगीकरण बंद करावे, बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करा, कन्टेनमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे का, याची दक्षता घ्या. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा; मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागू नयेत. ज्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशा नागरिकांना महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने फोन करावेत. त्यांना वेळेचे स्लॉट द्या, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.
यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, डॉ. अमोलकुमार माने उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०९०७२०२१-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर शहरातील कोविड संसर्ग, लसीकरण यासंदर्भात शुक्रवारी महानगरपालिका कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित हाेते.