जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात गेल्या चार दिवसांत नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. बुधवारी नव्याने जयसिंगपूर व उदगांव प्रत्येकी एक रुग्ण आढळला. कोरोनाची रुग्णसंख्या तालुक्यात वाढली नसली तरी खबरदारीचा उपाय मात्र दिसून येत नाही. प्रशासनाच्यावतीने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे शिवाय, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगादेखील उगारला जात आहे. मात्र, जयसिंगपूर व शिरोळच्या बाजारात मास्क गायब गर्दी कायम असे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासन यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचे नियम पाळा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा शासनाने दिला आहे. पुन्हा एकदा मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असतानाही बाजारात नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल तर शासनाचे नियम पाळावेच लागणार आहेत. तालुक्यातील तीन गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. जयसिंगपूर ४, उदगांव २ व नांदणी ३ असे कोरोनाचे रुग्ण आहेत.
दरम्यान, बुधवारी शिरोळ येथे आठवडा बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांचीही संख्या दिसून आली. नगरपालिका कर्मचारी बाजारात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत होते तर पुढे जाऊन मास्क काढून फिरणारेही नागरिक दिसत होते. त्यामुळे नियम कोण पाळणार, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनावर खबरदारी हाच उपाय असल्याने नागरिकांनी बेफिकीर राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
फोटो - २४०२२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे आठवडा बाजारात मास्क न लावताच अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत होते. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)