उदगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ग्रामस्थांना हानिकारक आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक रोखायचा असल्यास नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सरपंच वृषभ पाटील यांनी केले.
कोथळी (ता. शिरोळ) येथे कोरोना समितीच्या वतीने बैठक आयोजित केली होती. सरपंच पाटील म्हणाले, शासनाने घालून दिलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी अकरापर्यंतच सुरू राहतील. यामध्ये किराणा माल, दूध डेअरी, बेकरी आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
दरम्यान गावात एकाच घरात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा उद्रेक होईल. ज्या नागरिकांनी मास्क न वापरणे, विनाकारण फिरणे यांच्यावर दंडात्मक व कडक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक अधिकारी सी. एम. केंबळे, उपसरपंच आकाराम धनगर, कुमार सुतार, नितीन वायदंडे, विलास कोरवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.