सावरवाडी : कुंभी-कासारी साखर कारखान्यातील होणारी लूट थांबविण्याबरोबर राजकीय अड्डा मोडण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढविली पाहिजे. कुंभी-कासारीच्या परिवर्तनासाठी कायकर्त्यांनी एकत्र येऊन एकास एक लढतीतून नवी क्रांती घडवावी, असे मत राजर्षी शाहू आघाडीच्या बीडशेड (ता. करवीर) येथे आयोजित बैठकीत नेत्यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश देसाई म्हणाले, नरके यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कुंभी-कासारी साखर कारखान्याचा वापर केला. विधानसभा निवडणुकीत कारखान्याचा बाजार मांडल्याने सध्या ‘कुंभी-कासारी’ कर्जबाजारी झाला. नरके यांच्या पराभवासाठी शेतकऱ्यांनी रान उठविले पाहिजे. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, कुंभी-कासारीत सत्ता बदल हा शेतकऱ्यांचा विजय आहे. गेल्या दहा वर्षांत कारखाना कार्यक्षेत्रात कोणताच विकास झाला नाही. ही निवडणूक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच होणार आहे. त्यामुळे एकी महत्वाची आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील म्हणाले, कुंभी-कासारीत समविचारी कार्यकर्त्यांनी नव्या बदलाकरिता एकत्र येणे गरजेचे आहे. बहुरंगी लढतीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.यावेळी कुंभी-कासारी बचाव समितीचे अध्यक्ष बाजीराव खाडे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील, पांडुरंग जाधव, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, पी. आर. पाटील, सज्जन पाटील, बाजीराव पाटील, यशवंत बँकेचे संचालक दिलीप खाडे, केरबा जाधव, बाबूराव ल. जाधव, श्रीपतराव दिवसे, यशवंत बँकेचे संचालक सर्जेराव हुजरे, मारुती कंदले, आदींनी मनोगत व्यक्त केले. भगवान सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डी. वाय. माने यांनी आभार मानले.बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक सत्यजित पाटील, तुकाराम माने यांच्यासहित काँग्रेस पक्ष, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)संदीप नरके यांच्या भूमिकेकडे लक्षकुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सुपुत्र संदीप नरके यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संदीप नरके काय भूमिका घेणार, याबाबत बैठकीत चर्चा झाली. संदीप नरके शेवटपर्यंत नरके विरोधी राहणार काय? असा प्रश्नही चर्चेत आला.
नरकेंच्या पराभवासाठी एक व्हा
By admin | Published: December 07, 2015 12:14 AM