कोल्हापूर : शेतकरी संघाच्या निवडणुकीत आपण स्वत: उमेदवार नाही, त्यामुळे कोणाला पाठिंबा देण्याचा आणि कोणाचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. सभासद जाणकार आहेत, संघाचे हित जपणाऱ्यांच्या पाठीशी ते राहतील, अशी माहिती संघाचे अध्यक्ष वसंतराव मोहिते यांनी दिली. वसंतराव मोहिते यांनी ऐनवेळी संघाच्या निवडणुकीतून माघार घेऊन त्यांनी सहकार क्षेत्राला धक्का दिला. त्यांच्या माघारीनंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी आपआपल्या परीने खुलासा केला असला तरी या निवडणुकीत त्यांची भूमिका नेमकी काय राहणार याविषयी उत्सुकता लागली आहे. त्यांना मानणाऱ्या सभासदांची संख्या निर्णायक असल्याने त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे, हे ओळखून दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोहिते म्हणाले, काही गोष्टींमुळे माघार घेतली, आता काही आपण उमेदवार नाही. प्रचारासाठी दोन्ही पॅनेलमधील उमेदवार येतात, भेटतात. ते त्यांचे काम करत आहेत. पाठिंब्याबाबत आपणाला कोणी भेटलेले नाही, अथवा मी कुठेही गेलेलो नाही. त्यामुळे कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोहिते घराण्यावर प्रेम करणारा वर्ग मोठा आहे. त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था पसरली असेल, हेही खरे आहे, पण सभासद जाणकार आहेत, त्यांना काही सांगावे लागत नाही. संघाचे हित जोपासणाऱ्यांच्या पाठीशी ते राहतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. (प्रतिनिधी)
संघाचे हित जपणाऱ्यांच्या पाठीशी रहा
By admin | Published: September 24, 2015 12:55 AM