कोल्हापूर , दि. २६ : राज्याची आर्थिक स्थिती सध्या खालावली आहे. शिक्षण क्षेत्रातील बहुतांश मागण्या आर्थिक बाबींशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी जरा धीर धरावा. या मागण्या न्याय असून सरकारकडून त्या निश्चितपणे सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ५७ व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावरील या कार्यक्रमास कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक,आमदार उल्हास पाटील, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे,अधिवेशनाचे अध्यक्ष संदिपान मस्तूद प्रमुख उपस्थित होते.
महसूलमंत्री पाटील म्हणाले, राज्याचे एकूण बजेट १ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे आहे. यातील १ लाख कोटी रुपये वेतन, निवृत्तीवेतनावर खर्च होतात. उर्वरीत ५३ हजार कोटींमध्ये राज्याचा कारभार चालवावा लागतो. यातच शेतकऱ्यांसाठी आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी ३४ हजार कोटींची कर्जमाफी आमच्या सरकारने केली आहे.
एकूण खर्चाच्या तुलनेत अपेक्षित महसूल थोड्या कमी प्रमाणात जमा होतो. या परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. बचत आणि उत्पन्नाचे नवे स्त्रोतांची सुरुवात करुन महसूल वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहा-आठ महिन्यांत आर्थिक स्थितीमध्ये निश्चितपणे सुधारणा होईल. हे वास्तव लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी थोडा धीर धरावा.
कृषीराज्यमंत्री खोत म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा दिवसागणिक वाढत आहे. मशीन म्हणून विद्यार्थ्यांकडे पाहिले जात असून याबाबत पालकांचे प्रबोधन शिक्षकांनी करावे. मुलांची क्षमता जाणून ज्ञानदान करुन बोलीभाषेतील शिक्षण टिकविण्यात यावी.
खासदार महाडिक म्हणाले, शिक्षण क्षेत्रात सध्या गोंधळ, विस्कळीत स्थिती आहे. आॅनलाईन, डिजिटलकडील वाटचाल चांगली मात्र, त्यातील अडचणी सोडविणे तितकेच गरजेचे आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष मस्तूद म्हणाले, शिक्षण क्षेत्रासमोरील समस्या सोडविण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे.
या अधिवेशनाचे उदघाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्न मांडले. विविध निर्णय घेताना सरकारने या शिक्षण क्षेत्रातील घटकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली.
अधिवेशनाची स्मरणिका, मुख्याध्यापक संघ प्रकाशित ‘राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक हुकूमनामे कार्यवाही व फलश्रृती’या पुस्तकाचे आणि डी. बी. पाटील लिखित शैक्षणिक विचार भाग चार, कर्मपूजा या आत्मवृत्ताच्या दुसºया भागाचे प्रकाशन झाले.
अधिवेशनाचे माजी अध्यक्ष आर. डी. पवार यांनी नूतन अध्यक्ष मस्तूद यांना सूत्रेप्रदान केली. संघाला मदत निधी म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी एक लाख, तर सुभाष माने यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश सुर्पूद केला.
यावेळी अदिनाथ थोरात, विद्या मस्तूद, ज्योती पाटील, अभयकुमार साळुंखे, आनंदराव पाटील, व्ही. जी. पोवार, आर. डी. पाटील, वसंतराव देशमुख, एम. के. गोंधळी, शरदचंद्र धारुरकर, आर. वाय. पाटील, डी. एस. घुगरे, बी. जी. काटे, के. के. पाटील, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, सी. एम. गायकवाड, आदी उपस्थित होते. प्राजक्ता पाटील, शितल हिरेमठ, राजेंद्र भोरे, दत्तात्रय लवटे यांनी सूत्रसंचालन केले. ए. एम. पाटील यांनी आभार मानले.