पेठवडगांव : घरादाराचा विचार न करता शेतकऱ्यांची दुखणी मांडणाºया राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहा, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आवाहन केले. पेठवडगाव येथील नगरपालिका चौकात शुक्रवारी रात्री झालेल्या शेट्टी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या निमित्ताने स्वाभिमानी पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शनकेले.पवार म्हणाले, ‘ एका ऐतिहासिक सभेसाठी आपण आलो आहोत. देशातील १२० कोटी जनतेची भूक भागविणाºया, काळ्या आईशी इमान राखणाºया शेतकºयांच्या प्रश्नांसाठी राबणारा उमेदवार राजू शेट्टी यांना विजयी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे.गेली १० वर्षे मी संसदेमध्ये शेट्टी यांना पाहतो. त्यांना एकच चिंता म्हणजे म्हणजे भावा-बहिणींना दिवस कसे चांगले येतील. दुसरा विचार त्यांनी केला नाही. आमचीही दिशा तीच होती. मात्र मार्ग वेगळे होते. देशात चुकीचं घडत आहे, असे सांगून पवार यांनी शेट्टी आणि धनंजय महाडिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.खासदार शेट्टी म्हणाले,‘ उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अन्य कुठली फडकी फडकू देऊ नका, अशी टीका केली होती. मात्र याच फडक्यांतून गोरगरिबाची शिदोरी येते हे त्यांनी लक्षात ठेवावे. शेतकºयांसाठी सत्तेवर लाथ मारू म्हणणारे, अमित शहांना अफजलखान म्हणून कोथळा काढणारे त्यांना एकदम मिठ्या कसे मारायला लागले ?यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे यांची भाषणे झाली. मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, माजी महापौर सुरेश पाटील, अशोक जांभळे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तुमचं-आमचं भांडण संपलंज्यांंनी शेट्टींना जेवणाचं आमंत्रण दिलं ते लबाडाघरचं होतं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी रस्ता बदलला. त्यांच्या भूमिकेचे आम्ही सर्वांनी स्वागत केले. येणारं राज्य हे कष्टकºयांच्या हिताची बाजू घेणारे असेल, अशी आम्ही सर्वांनीच भूमिका घेतली. त्यामुळं तुमचं-आमचं भांडण संपलं, असे सांगत पवार यांनी शेट्टी यांच्यासोबतच्या दोस्तीचे समर्थन केले.पवार यांच्याबध्दल उत्सुकताहातकणंगले मतदार संघातील शेट्टी यांच्या प्रचारासाठी आणि स्वाभिमानीच्या व्यासपीठावर पवार पहिल्यांदाच आले. त्याबद्दल लोकांत कमालीची उत्सुकता होती. पवार नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी पवार यांनी शेट्टी यांचे तोंडभरून कौतुक करीत टाळ्या, शिट्ट्या वसूल केल्या.मीबी ध्यानात ठेवलंयसतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत यावेळी पवार यांनी नाव न घेता इशारा दिला. वृत्तपत्रामध्ये वाचलं की आमच्याच काही भाऊबंदांनी ‘आमचं ठरलंय’ अशी जाहिरात दिलीय. जर तुमचं ठरलंय तर ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ हे लक्षात घ्या, असा इशाराच पवार यांनी सतेज पाटील यांना दिला.उष्ट्या तुकड्यासाठी कशाला गेला ?आमच्यातच असणारे काहीजण तिकडे गेले आहेत. काय कमी केलं होतं त्यांना पक्षानं? दहा वर्षे तार्इंना संसदेत पाठवलं. मुलाला झेडपीमध्ये संधी दिली. मग कशासाठी हे करता? उष्ट्या तुकड्यासाठी कशाला गेलात? अशा शब्दांत पवार यांनी माने कुटुंबाचा समाचार घेतला. थोडा जरी स्वाभिमान असेल तर तो रस्ता आपला नाही, त्या रस्त्याने जाऊ नका, असे आवाहनही पवार यांनी केले.
Lok Sabha Election 2019 शेट्टींच्या पाठीशी राहा; शरद पवार यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:04 AM