गारगोटी-रांगणा गडावर तंबाखू खाल्याच्या कारणावरून गारगोटी येथील युवकास मारहाण करून त्याची मोबाईलवर क्लिप काढणाऱ्या त्या चौघा जणांना गारगोटी येथील नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चौघा जणांवर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ॠषिकेश भरत माने, प्रसाद शिवाजी माने दोघे कोगनूळी, उमेश राजाराम माने (रा. वडणगे), विजय नामदेव गुरव (रा. शिरगाव, करवीर) या चौघाजणांना भुदरगड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद ओंकार श्रीकांत जाधव (सुदर्शन नगर ,गारगोटी) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.२६ जानेवारी रोजी रांगणा गडावर फिरण्यासाठी गेलेल्या गारगोटीतील एका युवकाला तंबाखु खाल्याच्या कारणावरून कोगणुळी येथील चार तरुणांनी माफी मागण्यास सांगून जमीनीवर नाक घासावयास लावले. माफी मागावयास खाली वाकलेनंतर त्या युवकाला लाथाबुक्यांनी तसेच झाडाच्या फांदीने निर्दयीपणे बेदम मारहाण केली.
यावेळी त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच मारहाणीचे मोबाइलवरून शुटींग करून व्हायरल करून स्टंटबाजी केली. युवकास निर्दयीपणे केलेल्या मारहाणीच्या वार्ता गारगोटी शहरात सर्वत्र वार्यासारखी पसरली. निर्दयी मारहाणीचे शुटींग पाहून संतप्त झालेले तरूण मारहाण करणार्या त्या चौघांची वाट पहात बसले होते.
मारहाण करणारे हे चार जण मंगळवारी रात्री आपल्या गावी परत जात असतांना त्यांना वाटेत अडवून संतप्त जमावाने बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.