कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने दिलबहार तालीम मंडळावर १-० अशा गोलफरकाने मात केली.छत्रपती शाहू स्टेडियममध्ये दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लढत झाली. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून सागर चिले, इमॅन्युअल, राहुल पाटील, कैलास पाटील यांनी तर दिलबहार तालीम मंडळाकडून अक्षय दळवी, राहुल तळेकर, जावेद जमादार, रोहन दाभोळकर यांनी गोल करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, समन्वयाअभावी त्यांना गोल करता आले नाहीत. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत राहिला.उत्तरार्धात दोन्ही संघांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल करत शॉर्टपासवर भर देत दोन्ही संघांची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून सागर चिलेने उत्कृष्ट गोल करत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर प्रॅक्टिस संघाने अधिकच खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या चढाईमध्ये इंद्रजित चौगुलेने मोठ्या डी बाहेरून मारलेला चेंडू गोल पोस्टवरून गेला.
हे आक्रमण रोखण्यासाठी दिलबहार तालीम मंडळाने प्रॅक्टिस संघाची बचावफळी भेदण्यास प्रारंभ केला. यामध्ये दिलबहार तालीम मंडळाकडून राहुल तळेकर, जावेद जमादार, रोहन दाभोळकर यांनी खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली तरी आघाडी भक्कम करण्यासाठी प्रॅक्टिसकडून राहुल पाटील, दिग्विजय वाडेकर, जय कामत यांनी खोलवर चढाया करत सामन्यावर पकड निर्माण केली. मात्र, दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. प्रॅक्टिसची आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिल्याने सामन्यात १-० अशा गोलफरकाने विजय मिळविला.
- उत्कृष्ट खेळाडू : परविन बलबिरसिंग (प्रॅक्टिस)
- लढवैय्या खेळाडू : रोहन दाभोळकर (दिलबहार)