हुपरी : इचलकरंजीतील मिरवणुकीत सहभागी होऊन परतणाऱ्या गाडीला पाकिस्तानचा ध्वज व शर्टच्या खिशाला विशिष्ट असा बिल्ला लावल्याच्या गैरसमजातून पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे चौघा परप्रांतीयांना जमावाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी बजरंग दलाच्या सहा जणांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोघा अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत माहिती दिली नाही.घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सोमवारी पैगंबर जयंती व ईद ए मिलादच्या निमिताने इचलकरंजीमध्ये गुरुवारी मिरवणूक काढण्यात आली होती. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामांवर असणारे व पट्टणकोडोली येथे वास्तव्यास असलेले कांही परप्रांतीय तरुण या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. मिरवणूक संपवून हे सर्वजण गावाकडे परतत असतांना त्यांच्या खिशाला विशिष्ट असा बिल्ला व गाडीला हिरवा ध्वज लावण्यात आला होता. हा ध्वज पाकिस्तानचा असल्याच्या गैरसमजातुन नविन बसस्थानकानजिक थांबलेल्या काही तरुणांनी ही गाडी अडविली. आतील तरुणांना बाहेर ओढून काढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असणाऱ्या तरुणाने ही घटना पोलिसांना कळविली असता पोलिस घटनास्थळी तातडीने आले व त्यांनी त्या परप्रांतीय तरुणांची सुटका केली. या मारहाणप्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समजते.
Kolhapur: पाकिस्तानचा ध्वज लावल्याच्या गैरसमजातून परप्रांतियांना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 4:37 PM