कोल्हापूर : रंकाळ्याच्या धर्तीवर राजाराम तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा निधी मागणी प्रस्ताव आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावर ठाकरे यांनी पर्यटनदृष्ट्या तलावांचे महत्त्व वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितल्याने राजाराम तलावाच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठ व राष्ट्रीय महामार्गालगत असलेला राजाराम तलाव हा छत्रपती राजाराम महाराजांनी उचगाव व सरनोबतवाडी गावच्या शेतीसाठी बारमाही पाण्याचा पुरवठा व्हावा या करिता १९२८ मध्ये बांधून घेतला. निसर्गरम्य परिसर असल्याने येथे सकाळ, संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
रंकाळा, कळंबा तलावाप्रमाणे या देखील तलावाचे सुशोभीकरण झाले तर हे पर्यटनाचे केंद्र होऊ शकेल, यादृष्टीने आमदार ऋतुराज पाटील यांनी हा आराखडा तयार करून घेतला. प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत यासाठी निधी घेता येत असल्याने शुक्रवारी आमदार पाटील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्याकडे देत निधीची मागणी केली. यावर मंत्री ठाकरे यांनी सकारात्मक असल्याचे सांगितले.
फोटो: १६०७२०२१-कोल-आमदार पाटील
फोटो ओळ : कोल्हापुरातील राजाराम तलाव सुशोभीकरण प्रस्ताव आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे देऊन निधीची मागणी केली.