विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या पुढाकाराने लखनौ येथील राजभवनच्या प्रांगणात सोमवारी महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा पार पाडला. सोहळ्याला उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, डॉ. प्रकाश आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक असलेल्यांपैकी सुमारे एक ते दीड हजार मराठी बांधवांनी पांढरा पायजमा, नेहरू शर्ट आणि गांधी टोपी अशा पारंपरिक पोशाखात हजेरी लावल्याने लखनौच्या राजभवनचे आवार अक्षरश: मराठीमय झाले होते.या गलाई व्यावसायिकांनी राम नाईक यांची भेट घेऊन लखनौमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्याची परवानगी मागितली. नाईक यांनी तातडीने संमती देऊन लखनौ येथील राजभवनची जागा कार्यक्रमासाठी दिली.उत्तरप्रदेश मराठी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ मे रोजी सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या राजभवन प्रांगणात पारंपरिक वेशभूषेत प्रवेश करताच वातावरण मराठीमय झाले. राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह संजयकाका पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावली.‘जय शिवाजी, जय भवानी च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव मिणशे, मुख्य सचिव सुधवर बोबडे, सचिव ज्योतिका पाटकर, अलिगढचे ऋषिकेश भास्कर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप साळुंखे, संजय तरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक एस. बी. तिरोडकर, आजमगढचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी, ऋती सुगणकर, जॉर्इंट कमिशनर वृंदा देसाई, संघटनेचे विश्वनाथ देवकर, पांडुरंग राऊत, गजानन पाटील, आग्राचे लालासाहेब महिंद, विनायक पवार, मिर्जापूरचे मराठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)योगींचे ‘जय महाराष्ट्र’उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीतून केली. त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख केल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतूनच त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणे उत्तरप्रदेशचा स्थापना दिन दि.२४ जानेवारीला साजरा करण्यात येईल, अशी घोषणा आदित्यनाथ यांनी यावेळी केली. गीत रामायण व भावगीतांची मैफल...लखनौच्या राजभवनात महाराष्ट्र दिनाचा योग पहिल्यांदाच घडवून आणण्यात आला. मराठी मंडळाचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्यासह मराठी गलाई बांधवांनी नेटके नियोजन केले होते. श्रीधर फडके यांच्या गीत रामायण व भावगीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याला चांगलीच रंगत आली होती.
लखनौमध्ये रंगला महाराष्ट्र दिनाचा सुंदर सोहळा
By admin | Published: May 03, 2017 12:03 AM