लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभियान जाहीर केले आहे. शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून यामधील उत्कृष्ट कार्यालयांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. वर्षभरात तीन टप्प्यात हे अभियान राबवले जाणार आहे.
शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवसातील अधिकाधिक वेळ हा कार्यालयात जात असतो. त्यामुळे कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर आणि पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे जनतेला होत असतो. म्हणूनच शासनाची सर्व कार्यालये स्वच्छ, नीटनेटकी असावीत यासाठी हे अभियान जाहीर करण्यात आले आहे.
हे अभियान दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च, १ मे ते ३१ जुलै, १ सप्टेंबर ते ३० नोव्हेबर या तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. अभियानाचा पहिला टप्पा संपल्यानंतर एप्रिल महिन्यातच आढावा आणि पुढील टप्प्याचे नियोजन केले जावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. याच अभियानातील मूल्यमापनावेळी महसूल व वन विभागाच्या ‘महाराजस्व अभियान’ आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा ‘कायाकल्प पुरस्कार’ याचेही मूल्यमापन केले जाणार आहे.
या अभियानाची तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील पूर्वतयारी, अभियानाची विस्तृत रूपरेषा, अवलंब करावयाची कार्यपध्दत, विविध पुरस्कार निवड समित्या, मूल्यांकन पध्दती याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन महिन्यात विस्तृत अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करणार आहे.
चौकट
‘यशदा’कडून होणार दस्तऐवजीकरण
पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे अनुकरण अन्य विभागात आणि कार्यालयांमध्ये करण्यासाठी पुरस्कार प्राप्त कार्यालयांचे दस्तऐवजीकरण ‘यशदा’मार्फत करण्यात येणार आहे. निवडक कार्यालयांचे अनुकरण राज्यातील अन्य कार्यालयांनी करावे यासाठी कार्यपध्दती सुनिश्चित करण्याची जबाबदारीही ‘यशदा’कडे दिली आहे.