सतीश पाटील
शिरोली :
शिरोली येथील काशीलिंग बिरदेव तलावाचे सौंदर्य लवकरच खुलणार असून सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यावरण विभागाकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये बिरोबा तलाव सुशोभीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सध्या या तलावाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून तलवाचे सुशोभीकरण एक वर्षानंतर पूर्णत्वास जाणाार आहे, असे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा
उपअभियंता बारटक्के यांनी सांगितले. राज्य सरोवर संवर्धन योजनेतून तलाव सुशोभीकरणाचे काम होणार असून, तलाव संवर्धन निधीतून नौका विहार, उद्यान, बालोद्यान, सौंदर्यीकरण, हरितपट्टा, स्वच्छतागृहे, प्रदूषण करणारी वनस्पती काढणे, सांडपाणी रोखणे, गाळ काढणे, जैविक प्रक्रियेने पाण्याची गुणवत्ता वाढवणे, तलावाभोवती कुंपण घालणे ही कामे होणार आहेत. यासाठी तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, तर गेल्या वर्षभरात तलावाच्या सभोवती संरक्षण भिंत उभी करण्यात आली आहे. गॅबिंग हाॅलभिंत तसेच माळवाडी भागातील येणारे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. पेईंग ब्लॉग, बगीचा, हायमॅक्स, शौचालय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी कामे अपुरी आहेत. ही कामे पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, सलिम महात, प्रकाश कौंदाडे, सूर्यकांत खटाळे, संदीप कांबळे उपस्थित होते.
चौकट : शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांनी ईशान्य बाजूला २०० मीटरपर्यंत संरक्षण भिंत उभी करावी, अशी मागणी केली. यावर ठेकेदार संजय पाटील यांनी या भागात संरक्षण भिंत उभी केली, तर ती काळ्या जमिनीत ती खाली खचण्याची भीती व्यक्त केली. यावर खवरे यांनी आम्ही लागेल ती मदत करतो, पण संरक्षण भिंत उभी कराच, अस अट्टाहास धरला. त्यामुळे उपअभियंता बारटक्के यांनी पर्याय काढून गॅबिंग हाॅल भिंत उभी करण्याची ग्वाही दिली.
फोटो : १९ शिरोली तलाव
शिरोली येथील तलावाच्या कामाची जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता बारटक्के यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, अनिल खवरे, उपसरपंच सुरेश यादव व ठेकेदार संजय पाटील उपस्थित होते.