राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ज्वेलरीच्या आडून भिशी चालविणे, त्यातून सावकारी करणे हे प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. ज्वेलरीच्या व्यवसायात स्पर्धा वाढल्याने ग्राहक कमी झाले, त्यातून भिशीचे फॅड आले, दरमहा हप्त्याच्या आकर्षक व्याजाच्या योजनेत पैसे गुंतवण्यास लावायचे, ते पैसे मासिक व्याजाने इतरत्र फिरवायचे आणि त्यातून पैसा कमवायचा, असा हा प्रकार आहे. त्यामुळे बालिंगेतील ‘अंबिका’ ज्वेलर्सचा सतीश पोवाळकर यांचा पेट्रोलपंपावरील कर्मचारी ते ज्वेलरीचा मालक, असा थक्क करणारा प्रवास आहे. पोवाळकरसारखे असे अनेक सोनार यामध्ये असून, त्यामध्ये लाखो जण अडकले आहेत.
बालिंगे (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचे सतीश पोवाळकर याने भिशीचे पैसे गोळा करून पोबारा केल्याने अशा प्रकारची गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. भाजीपाला विक्रेत्यांसह बडी मंडळीही या साेनाराच्या व्याजाच्या मोहात अडकली आहेत. सोनार व्यवसायाच्या आडून भिशी गोळा करण्याचा सर्रास प्रकार सुरू असून, यामध्ये जिल्ह्यात लाखो गुंतवणूकदार अडकले आहेत. यावर कोणाचाही अंकुश नसल्याने सोनार सामान्य माणसाला उघड फसवीत आहेत.
महिन्याला ठराविक रक्कम भरायची, असे बारा महिने हप्ते भरल्यानंतर तेराव्या महिन्याचा हप्ता व्याज म्हणून ग्राहकांना दिला जातो. काही जण हे पैसे रोखीने परत करतात, तर काहींची त्या पैशातून त्यांच्याकडेच सोने खरेदीची सक्ती असते. बाजारात आता अनेक कंपन्या गुंतवणुकीसाठी व्याजाचे आमिष दाखवितात. त्यात पैसे गुंतवितात आणि फसतात. बँकांच्या व्याजापेक्षा जास्त मिळते म्हटल्याने त्याकडेच ओढा वाढला असून, व्याजाच्या हव्यासापोटी मुद्दलीलाही मुकण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
महिलांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
सोनाराकडील भिशीमध्ये ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. महिन्याला शंभर रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंत हप्ते भरले जातात. वर्षाच्या शेवटी चांगले व्याज मिळते, त्यातून सोने घेता येईल, या आशेपोटी यामध्ये गुंतवणूक वाढली आहे.
सावकाराप्रमाणे मासिक ३ टक्क्यांप्रमाणे परतावा
मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास संबधितांना मासिक ३ टक्के व्याज दिले जाते. हेच पैसे मासिक ५ ते १० टक्क्यांप्रमाणे फिरविले जातात, त्यातून बक्कळ पैसा मिळत असल्याने सोनारांची सावकारी फोपावली आहे, तर काही योजनेत वार्षिक १८ टक्क्यांप्रमाणे परतावा मिळतो, बँकांपेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने सामान्य माणसांबरोबरच मोठी मंडळीही या जाळ्यात अडकली आहेत.
‘विश्वास’ हाच गुंतवणुकीचा ‘कागद’
लाखो रुपयांची गुंतवणूक करताना त्याची कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे असते. मात्र, सोनाराकडील गुंतवणुकीत ‘विश्वास’ हाच गुंतंवणुकीचा ‘कागद’ असतो. काहींनी मासिक हप्त्यासाठी गुंतवणूकदाराला पासबुक दिले जाते.