मुरगूड : सायकलवरून मुरगूड ते बिद्री प्रवास करून कारखान्यात रोजंदारीवर काम करणारा कर्मचारी... तब्बल सव्वीस वर्षे ते सेवा करत होते. नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंत सायकलवरून सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याचा मुलगाच त्याच कारखान्याचा एमडी बनतो... अशी चित्रपटाला साजेशी बिद्री आणि मुरगूड परिसरात प्रेरणादायी ठरणारी गोष्ट घडली आहे.
मुरगूडमधील सर्वसामान्य कुटुंबातील किसन साताप्पा चौगले यांची दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यांची निवड प्रेरणादायी आहे. अल्पशिक्षित साताप्पा हरी चौगुले हे १९७० च्या बिद्रीच्या श्री दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये सुरुवातीला फिटर म्हणून सेवेत रुजू झाले. १९९६ ला ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा मुलाची आज त्याच कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदावर नेमणूक झाली आहे. आर.डी. देसाई निवृत्त यांच्या जागी त्यांना या पदावर संधी मिळाली.
चौगुले यांनी येथील शिवाजी विद्यामंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण, मुरगूड विद्यालयमध्ये माध्यमिक आणि शिवराज कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी विज्ञान शाखेतील बी.एस्सी. पदवीचे शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे केले. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे येथे शुगर टेक कोर्स पूर्ण केला. जीडीसी अँड ए, एमबीए आणि एमपीएम त्यांनी केले.
अहमदनगर वृद्धेश्वर कारखान्यावर ट्रेनी केमिस्ट म्हणून १९९५ साली सेवेला सुरुवात केली. शिरूर येथील घोडगंगा साखर कारखाना, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, तसेच हमिदवाडाच्या मंडलिक साखर कारखान्यावर चाचणी गळीत हंगामापासून सलग आठ वर्षे व त्यानंतर कर्नाटकात रामदुर्ग तालुक्याच्या शिवसागर साखर कारखान्यावर आठ वर्षे सेवा बजावली. दरम्यान, साखर कारखान्यावर एम.डी. नियुक्त होण्यासाठी आवश्यक परीक्षा पास झाल्यानंतर चौगले यांची एम.डी. पॅनलवर निवड झाली. त्यातून दोन वर्षांपूर्वी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर कार्यकारी संचालकपदावर ते कार्यरत होते. आज वयाच्या ४९ व्या वर्षी चौगुले कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीतील मातृसंस्था असलेल्या आणि कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्य बिद्री साखर कारखान्यावर त्यांची एमडी म्हणून निवड झाली आहे.