कोल्हापूर : ख्रिस्तीबांधवांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याने मंगळवारी दुपारी कनाननगर परिसरातील कुटुंबाने महिलेचा मृतदेह असलेला टेम्पो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणला. महापालिकेचे अधिकारी जागेविषयी ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत मृतदेह परत नेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अखेर शाहूपुरी पोलिसांनी त्यांची समजूत काढून प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मृतदेह घेऊन परत केले.कनाननगर परिसरातील वंदना राजेश वाघमारे यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. मात्र, कुटुंबियांना मंगळवारी दुपारपर्यंत दफनविधीसाठी समाजाच्या प्रस्थापित दफनभूमीत जागा जागा मिळाली नाही. त्यामुळे वाघमारे यांचे भाऊ विवेक भालेराव यांनी मृतदेह असलेला टेम्पो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आणून लावला.ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी या मागणीसाठी समाजाने वारंवार आंदोलने केली आहेत. ख्रिश्चन समाजाच्या कोल्हापुरात शेकडो एकर जागा असतानाही त्यांचे विश्वस्त दफनभूमीसाठी त्यातील जागा देत नाहीत. वारंवार मागणी करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, पोलिसांनी विवेक भालेराव यांची भेट घेऊन लवकरच प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यावर त्यांनी मृतदेह परत नेला.
Kolhapur: दफन करण्यासाठी जागा नाही, बहिणीचा मृतदेह घेऊन भावाने केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:50 IST