कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे सीपीआरमधील कोरोना रुग्ण आणि संशयित कोरोना नागरिकांसाठीचे बेड संपले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात रुग्णांची गैरसोय होणार असून, प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात नवे ८२ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात ४४ नवे रुग्ण आढळले आहेत. गडहिंग्लज तालुक्यात १, हातकणंगले ४, कागल १, करवीर १०, शाहूवाडी १, शिरोळ २, नगरपालिका कार्यक्षेत्र ५ आणि इतर जिल्ह्यातील १४ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. दिवसभरामध्ये ४२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १२९९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. १५१ जणांची अन्टिजेन चाचणी करण्यात आली असून, ७७२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरामध्ये ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
करवीर तालुक्यातल आंबेवाडी येथील ५० वर्षीय महिला, कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील ७१ वर्षीय पुरुष, कागल तालुक्यातील माद्याळ येथील ६२ वर्षीय पुरुष, हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील ६८ वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १७७२ झाली आहे.
सध्या सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय या ठिकाणी प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या व्यतिरिक्त ज्यांना शक्य आहे, ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु बहुतांशी सर्वसामान्य कोरोना रुग्ण सीपीआरमध्ये दाखल करण्यात येत आहेत. या ठिकाणी संशयित कोरोना रुग्णही दाखल आहेत. अशा सर्वांसाठी १७५ बेड उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातील १६९ बेडवर आता पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढवण्याची गरज आहे.
कोट
कोरोनाचे रुग्ण आणि संशयित नागरिक यांच्यावर सध्या सीपीआरमध्ये मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू आहेत. पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता, यापुढच्या काळात दुधगंगा इमारतीत २०० खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
डॉ. एस. एस. मोरे
अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर