आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0७ : यंदाच्या मान्सून हंगामातील पहिले ‘मृग ’ नक्षत्र उद्या, गुरूवार पासून निघत आहे. बुधवारी सकाळ पासूनच ढगाळ वातावरणासह पावसाची हवा तयार झाल्याने ‘मृगाच्या सलामीकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी धूळवाफ पेरण्या पुर्ण झाल्या आहेत.
यंदा मान्सून भरपूर असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. गेले महिनाभर उन्हातान्हात राबून खरीप पेरणी करून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होणार असा अंदाज वर्तवला होता, पण पहिला आठवडा संपला तरी अद्याप मान्सून सक्रीय झालेला नाही. गेले दोन दिवस मान्सूनचे वातावरण तयार होत आहे. बुधवारी सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले. आकाशात ढगांची दाटी केल्याने कोणत्याही क्षणी पावसास सुरूवात होईल, असे वाटत होते. दुपारी बारा नंतर ढगांची दाटी कमी होऊन सुर्यनारायणाने दर्शन दिले. आतापर्यंत बहुतांशी धूळवाफ पेरण्याचे कामे झाली असून आता पावसाची प्रतिक्षा आहे.
गुरूवारी सकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी सुर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. वाहन ‘मेढा’ आहे. या काळात राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेले वर्षीचा अनुभवन पाहता मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने थांबण्याचे नावच घेतले नाही.
भुईमूग, सोयाबीनच्या पेरण्या खोळबंल्या !
गेले आठवड्यात सलग दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भुईमूग व सोयाबीन पेरणीसाठी शिवारे तयार करून ठेवली. पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. भुईमूग व सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी घरात आणून ठेवले असून पावसाची सुरूवात होताच पेरणीसाठी एकच धांदल उडणार आहे.
दोन दिवसात भात कोळपणीस वेग
मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात झालेल्या भाताच्या धूळवाफ पेरणीची उगवण सुरू झाली आहे. मध्यंतरी सलग दोन दिवस झालेल्या पावसाने भाताची उगवण सुरू झाली असून अनेक ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसात कोळपणीची कामे सुरू होणार आहेत.