गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात सोयाबीन काढणीच्या धांदलीला प्रारंभ झाला. मान्सूनने यंदा वेळेवर हजेरी लावल्याने पिकाला पोषक आणि मुबलक पाऊस झाल्याने सोयाबीन पीक यंदा जोमात आले आहे.दरवर्षी गणेशचतुर्थी उत्सवात सुरू होणाऱ्या सोयाबीन कापणीला यंदा मात्र दहा दिवस उशीराने सुरूवात झाली आहे. चालूवर्षी वारंवार पाऊस असल्याने सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ऐन सोयाबीन, भुईमूग आणि शेती कामाच्या धांदलीवेळीच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अगोदरच मजुराअभावी मेटाकुटीला आलेले शेतकरी यंदा मजूर गोळा करणे, ऐनवेळी येणारा पाऊस आणि कोरोनामुक्त मजूर शोधणे अशा तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ३५०० रूपये दर मिळत आहे. मात्र, सोयाबीन काढणीसाठी महिलांना दिवसाकाठी सुमारे १५० तर पुरूष मंडळींना २०० तर एक पोते मळणीसाठी २३० ते २५० आणि मळलेले सोयाबीन घरापर्यंत आणण्यासाठी वाहतूक भाडे असा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनापेक्षा खर्चच अधिक येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.