येथील राजाराम बंधाऱ्याला पुराच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट नुकत्याच काढण्यात आल्या. प्लेट काढल्याने सध्या बंधाऱ्याजवळ ८ फूट इतकी पाण्याची उंची आहे. १७ फुटाला बंधारा पाण्याखाली जातो. गेले चार दिवस प्लेट काढण्याचे काम सुरू होते.
प्रत्येक वर्षी १ जूननंतर राजाराम बंधाऱ्याच्या प्लेट काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून हाती घेतली जाते. यंदा लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत असल्याने पाटबंधारे विभागाने गेल्या चार दिवसांपासून प्लेट काढण्याचे काम हाती घेतले होते. या प्लेटबरोबरच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावलेले लोखंडी ग्रीलही काढण्यात आले आहेत.
जूनच्या सुरुवातीला दोन-चार जोरदार पाऊस झाले की राजाराम बंधारा लगेचच पाण्याखाली जातो. एकदा बंधारा पाण्याखाली गेला की लोखंडी प्लेट काढता येत नाहीत. त्यामुळे कोणताही धोका नको म्हणून पाटबंधारे विभागाने या प्लेट वेळेच्या आधीच काढून टाकून बंधारा प्रवाहित ठेवला आहे.
राजाराम बंधाऱ्याला एकूण ५७ मोऱ्या आहेत. यातून नदीच्या खालच्या बाजूस पाणी वाहते. सध्या पाणी पातळी खालावल्याने पाण्याचा प्रवाहही काहीसा संथ आहे. पंचगंगा नदीची पावसाळ्यात व पुराच्या वेळी पाणीपातळीही राजाराम बंधाऱ्यावरील घेतली जाते. आता बंधाऱ्याच्या काढलेल्या प्लेट पावसाळा संपल्यानंतर बसवल्या जाणार आहेत.
फोटो : ०१
येथील राजाराम बंधाऱ्याला पुराच्या पाण्याचा धोका होऊ नये यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर नुकत्याच बंधाऱ्याच्या सर्व लोखंडी प्लेट काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे खालील बाजूस पाणी असेच सतत वाहत आहे.
(फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )