कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणप्रश्नी झालेल्या घटनेसंबंधी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात येऊन रॅली काढणार असल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर केले होते, परंतु त्यांचे येणेच रद्द झाल्याने हिंदुत्ववाद्यांनी शुक्रवारी जाहीर केलेला कोल्हापूर बंद मागे घेतला आहे. तसेच शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजता होणारी महाआरतीही रद्द करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.तत्पूर्वी गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठकीमध्ये जलील यांना कडाडून विरोध करण्याचा निर्णय झाला होता. महेश जाधव, सुजित चव्हाण, गजानन तोडकर, अशोक देसाई, शिवानंद स्वामी, सुनील सामंत यांची भाषणे झाली. यावेळी विशाळगड प्रकरणावरून कोल्हापुरात येणाऱ्या जलील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. याच दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जलील कोल्हापुरात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने संभाव्य बंद आणि महाआरती होणार नसल्याचे रात्री स्पष्ट करण्यात आले.त्यांना जाऊ द्यायला नको होते..जाधव म्हणाले, पालकमंत्र्यांनी अतिक्रमणप्रश्नी वेळीच खबरदारी घेतली नाही. घटना घडल्यानंतर ते प्रतिक्रिया देत आहेत. ते जर हिंदुत्वाची धार बोथट करणार असतील तर ते सहन करणार नाही. माजी गृहराज्यमंत्र्यांनी तातडीने जाऊन मदतीची घोषणा केली. इतर घटनांमध्ये नुकसान होते, त्यावेळी त्यांची अशी तत्परतेची भूमिका दिसत नाही; म्हणून त्यांचाही निषेध आहे.
कोल्हापूर बंद मागे, महाआरतीही रद्द; इम्तियाज जलील येणार नसल्याने हिंदुत्ववाद्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 1:24 PM