बेळगाव : राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीवरुन राज्य सरकारने कोरोनासंदर्भात शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील विकेंड कर्फ्यू (शनिवार, रविवारची संचार बंदी) मागे घेण्यात आला आहे.
राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने राज्यातील सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि रुग्णसंख्येचा नव्याने अभ्यास करून आढावा घेतला आहे. त्यानुसार कोरोनाच्या मागील लाटांच्या तुलनेत यावेळी गंभीर आजार आणि मृत्यूचे प्रमाण फारच कमी आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांचे प्रमाण मागील 16 ते 21 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी फक्त 5 टक्के आहे. पूर्वीच्या लाटांवेळी उपचारानंतर कोरोना मुक्त होण्यासाठी 14 दिवस लागत होते, आता 7 दिवसात रुग्ण बरे होत आहेत.रिकव्हरी रेट देखील 50 टक्के झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करून तज्ज्ञांच्या शिफारशीवरून राज्य कार्यकारी समितीच्या अध्यक्षांनी सुधारित नवी मार्गदर्शक सूचीचा आदेश जारी केला आहे. तो येत्या 31 जानेवारी 2022 पर्यंत कायम राहणार आहे. नवी सुधारित मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे आहे.
मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे
- दर शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू केला जाणारा वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशानुसार नाईट कर्फ्यू मात्र दररोज रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहील.- इतर निर्बंध आणि आदेश पूर्वीप्रमाणेच राहतील- मेळावे, धरणे, सभा -परिषदा, सामाजिक -धार्मिक -राजकीय आंदोलन, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका आदींवर बंदी असेल. तथापि लग्न समारंभांना खुल्या जागेत 200 पेक्षा अधिक आणि बंदिस्त जागेत 100 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहू नये, या अटीवर परवानगी असेल.- पब्स, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स आदी 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिला जावा.