कोल्हापूर : गेली चार दिवस कोल्हापूर ते बेळगाव बससेवा बंदच आहे. कर्नाटकातील निपाणी बससेवा मात्र सुरू असून दिवसभरात तीसहून अधिक फेऱ्या होतात.गेले तीन दिवसांपासून पूर्णत: बंद असलेली कोल्हापूर-कर्नाटक बससेवा काही अंशी सुरु झाली. सोमवारी रंकाळा-निपाणी ही बससेवा सुरू झाली असून दिवसभरात ३० हून अधिक फेऱ्या झाल्या.महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला शिवसेनेले केलेल्या आंदोलनाने झाली. तत्पूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला करत काळे फासण्याचा प्रयत्न झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी वाहतुकीसाठी उभ्या असलेल्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी एका कन्नडिगाने कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) मार्गावर जाणाऱ्या बसवर दगडफेक करत काच फोडली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाने कर्नाटककडे होणारी बस वाहतूक बंद केली.
ही बस वाहतूक सोमवारी अंशत: सुरू झाली असून दिवसभरात ९ बसेसद्वारे ३० फेऱ्या करण्यात आल्या. तर बेळगावकडे जाणारी वाहतूक अद्यापही बंद आहे. गडहिंग्लजकडे जाणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरून कापशीमार्गे वळविण्यात आली आहे.