कोगनोळी : कोगनोळी येथील पूरग्रस्तांच्या यादीमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटींची पूर्तता व्हावी, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सेक्रेटरी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना दिले होते. यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता. याची गंभीर दखल घेत बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी फेर पंचनाम्याचे आदेश देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.
2019 व 2021 साली कोगनोळी येथील दूधगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील नागरिकांच्या घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य शासनाने घरात पाणी गेलेल्या नागरिकांसाठी तात्काळ सहाय्य अनुदान व घरांच्या झालेल्या पडझडीच्या टक्केवारीनुसार अ, ब, व क या तीन प्रकारात नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. शासनामार्फत नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून पाणी शिरलेल्या व पडझड झालेल्या घरांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये काही नदीपासून दूर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांची नावे तसेच काही प्रत्यक्ष लाभार्थ्यांची नसलेली नावे अशा अनेक त्रुटी दिसून आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत प्रशासनास फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले.सोमवार पासून होणारे उपोषण स्थगित
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (दि.15) पासून उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी फेर पंचनाम्याचे आदेश दिल्याने उपोषण स्थगित करत असल्याची माहिती सुधीर माने यांनी दिली.
कोगनोळी ग्रामस्थांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यावर वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशावरून कार्यवाही करून ग्रामस्थांना योग्य तो न्याय दिला जाईल. -डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार निपाणी