बेळगाव : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथे शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी या हत्याप्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे याला घेऊन एसआयटीचे पथक बेळगावला आले आहे. बेळगाव परिसरावर एसआयटीची करडी राहणार नजर आहे.चौकशीत गौरी लंकेश यांची हत्या आपणच केली आणि यासाठी बंदूक चालवण्यासाठी बेळगाव येथे प्रशिक्षण घेतले अशी कबुली परशुरामने दिली आहे. यावरून एसआयटीच्या अधिकाऱ्यांना बेळगाव आणि परिसरातील काही हिंदुत्ववादी संघटनांवर संशय घेतला आहे. याबद्दल डीएसपी दर्जाच्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखाली त्याचा तपास सुरू असून अतिशय गुप्तपणे माहिती घेण्याचे काम सुरू आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यीक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या पुरोगामी विचारधारेतील व्यक्तींच्या एकामागोमाग हत्या झाल्या. यामध्ये कलबुर्गी व लंकेश हे कर्नाटकातील असल्याने कर्नाटक सरकारने स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम अर्थात एसआयटी स्थापन केली. या पथकाने सिंदगी (जि. विजापूर) येथून ११ जून रोजी परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. हत्येपूर्वी त्याचे वास्तव्य बेळगाव भागात होते, असे त्याने सांगितल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.स्थानिक पोलीस अधिकारीदेखील अनभिज्ञहत्येची कबुली दिलेला परशुराम ज्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांवर बारीक नजर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या हालचाली, व्यवहार आणि इतर गोष्टी तसेच शस्त्रास्त्रे आणण्याचे मार्ग याचासुद्धा शोध घेण्यात येत आहे. बेळगाव जवळील जंगलात एअरगनमधून ५00 गोळ्या झाडून प्रशिक्षण दिले गेल्याचे परशुरामने पोलीस तपासात कबूल केले होते. ती जागा कोणती ? सोबत कोण कोण होते? बेळगावातील स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेचा यात सहभाग होता का? याचा तपासदेखील एसआयटी अधिकारी करत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
एसआयटीच्या रडारवर बेळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:52 AM