बेळगाव : बेळगाव शहराला पुन्हा एकदा अशांततेचे ग्रहण लागले असून, काल, बुधवारी मध्यरात्री शहरातील चव्हाट गल्ली भागात दोन गटांत किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला. त्यानंतर त्याचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत सहा वाहनांची मोडतोड होऊन दहा मोटारसायकलींसह रिक्षा पेटविण्यात आली. या दगडफेकीत लहान मुलीसह चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. काल सायंकाळी दुसऱ्या धर्माच्या तरुणीशी प्रेमसंबंध जुळविलेला एक तरुण केळकर बाग येथून जात असताना त्याला तरुणांच्या एका गटाने पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्या तरुणाने खडेबाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करून मारहाणीबाबत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आणि येथूनच दंगलीची ठिणगी पडली. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्याला भेटण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण जमले होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासमोर तरुणांची गर्दी झाल्याचे समजताच पोलीस तेथे दाखल झाले आणि त्यांनी तरुणांना पांगविले. यानंतर चव्हाट गल्ली, दरबार गल्ली आणि परिसरात दंग्याला प्रारंभ झाला. काल रात्री अकरा ते पहाटे तीनच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या चव्हाट गल्ली, टोपी गल्ली, खंजर गल्ली, जालगार गल्ली भागात तुफान दगडफेक करण्यात आली. तसेच रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांची मोडतोड करून काही वाहने पेटविण्यात आली. दगडफेक झाल्यावर प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानेही बाहेरून आलेल्या गटावर दगडफेक केली. यावेळी एक रिक्षा पेटविण्यात आल्यामुळे चव्हाट गल्लीत आगीचे लोट दिसत होते. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूने तुफान दगडफेक सुरू होती. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगडफेक करणाऱ्या काही समाजकंटकांना ताब्यात घेऊन दिसेल त्याला झोडपून काढण्याचे सत्र आरंभले. मुख्यमंत्री आज बेळगावातबेळगाव शहरात उद्या, शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री सी. के. जॉर्ज आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, एका दिवसापूर्वी शहरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांवरील तणाव वाढला आहे.
बेळगावात तुफान हाणामारी
By admin | Published: September 11, 2014 11:23 PM