कोल्हापूर: संमतिपत्र दिल्याने जिल्ह्यात ९४० माध्यमिक शाळांची घंटा मंगळवारी वाजली अन् ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. माध्यमिक शाळा सुरू झाल्या असताना प्राथमिक शाळांच्या पातळीवर अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पालकांची , दक्षता समित्यांच्या संमती घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत, असे सांगून नेहमीप्रमाणे यातून अंग काढून घेतल्याने १९७६ प्राथमिक शाळातील विद्यार्थी आणि त्यांचे पालकही संभ्रमावस्थेत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने घरात बसून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याने पालकांनी केलेल्या विनंतीनुसार माध्यमिक शिक्षण विभागाने कोरोनाचा संसर्ग कमी झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याची चाचपणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील १०५४ माध्यमिकपैकी ९४० शाळांनी दक्षता समित्या व पालक समित्या यांचे ठराव आणि खुद्द पालकांची संमतिपत्रे लिहून घेतल्यानंतर स्वत:च्या जबाबदारी शाळा सुरू करत असल्याचे लिहून दिले. यानुसार मंगळवारपासून या सर्व ९४० शाळा सुरू झाल्या.
दरम्यान, याच माध्यमिक विभागाच्या धर्तीवर प्राथमिक शाळादेखील सुरू कराव्यात, अशी पालकांकडून मागणी होत आहे. पण जिल्हा परिषदेच्या प्राथिमक शिक्षण विभागाने अजून त्याबाबत काहीही तयारी केलेली नाही. पालकांकडून दबाव वाढल्यानंतर मंगळवारी स्थानिक पातळीवर तुमचा तुम्ही निर्णय घ्या, असे सांगणाऱ्या ताेंडी सूचना काढल्या आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील १९७६ शाळा सुरू करायच्या म्हटल्यातरी पालकांकडून संमतिपत्र लिहून घेणे, दक्षता व पालक समित्यांचे ठराव संकलित करण्याचे काम गावपातळीवरच नागरिकांना करावे लागणार आहे.
प्रतिक्रिया
पालकांकडून होत असलेल्या मागणीनुसार आम्ही संमतिपत्र लिहून दिलेल्या शाळा सुरू केल्या आहेत. जस-जसी संमतिपत्र येतील तशा शाळा सुरू करून सर्व प्रकारची दक्षता घेऊन शैक्षणिक सत्र सुरळीत होईल, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी, कोल्हापूर
प्रतिक्रिया
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या काही सूचना आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावा, असे गावांना सूचित करण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची समजून त्याप्रमाणे निर्णय घ्यावा.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर