पालकांची संमतीपत्रे मिळालेल्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, महानगरपालिका हद्दीतील शिक्षण संस्थाचालकांनी दि. ७ डिसेंबरपासून टप्प्या-टप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी, स्वयंअर्थसहाय्यित अशा ५८ शाळा सुरू झाल्या. त्यात राजमाता गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, वसंतराव देशमुख इंग्लिश मेडियम स्कूल, आदींचा समावेश होता. सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग, सॅनिटायझरसह हात धुण्याची व्यवस्था आणि एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था केली होती. थर्मल गनद्वारे तपासणी करून विद्यार्थी, विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश देण्यात आला. सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी बारा ते तीन यावेळेत शाळा भरल्या.
चौकट
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा सुरू
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारी सुरू झाले. त्यात न्यू हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूल आणि स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विमला गोएंका इंग्लिश मेडियम स्कूल, इस्लामपूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, नांदणी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश आहे. त्याठिकाणी ४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली, अशी माहिती या सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांनी दिली.
फोटो (०७१२२०२०-कोल-शाळा सुरू ०१ व ०२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षतेच्या सुविधांची पूर्तता झाल्याने कोल्हापूर शहरातील ५८ शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एस. एम. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरले. (छाया : आदित्य वेल्हाळ)