आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0३ : खंडपीठ आंदोलनबाबत पुढील आठवड्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक असून त्यानंतर त्यांच्यामार्फतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. खंडपीठाबाबत विविध आंदोलनाद्वारे प्रश्न मार्गी न लागल्याने निवडणुकीपूर्वी चर्चेद्वारे हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा प्रश्न चर्चेतून सोडविण्यात येणार आहे. त्यामुळे हे आंदोलन गुंडाळले म्हणणे चुकीचे असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित केलेले खंडपीठ आंदोलन गुंडाळले असल्याचा आरोप बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी रविवारी केला होता. त्या आरोपांचे अॅड. शिंदे यांनी खंडन करताना हे आंदोलन शांततेत सुरू आहे, खंडपीठचा प्रश्न चर्चेतून सोडविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे सहा जिल्ह्यांतील वकिलांचा लढा सुरू आहे. यासाठी कामकाज बंद, साखळी उपोषण, निदर्शने आदी मार्गांनी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बार असोसिएशनशी मुंबईत चर्चेवेळी हे आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार १५ जूनपर्यंत स्थगित ठेवण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा बार असोसिएशनची संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी सत्तेवर आली.
निवडणुकीपूर्वी या पदाधिकाऱ्यांनी सहा जिल्ह्यांतील वकिलांना खंडपीठ प्रश्न चर्चेद्वारे सोडविणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नूतन कार्यकारिणीने गेल्याच आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देण्याचे तसेच राज्य सरकारतर्फे सर्किट बेंच कोल्हापुरात करण्याबाबत उच्च न्यायालयाकडे लेखी मागणी करणार असल्याचे आवश्वासन दिले होते.
दरम्यान, पावसामुळे जिल्हा न्यायालयाच्या आावारातील आंदोलनाच्या मंडपाची दयनिय अवस्था झाल्याने हा मंडप काढण्यात आला; पण मंडप काढला म्हणजे आंदोलन गुंडाळले असे नव्हे, असेही नूतन अध्यक्ष अॅड. शिंदे म्हणाले. या आंदोलनाबाबत सहा जिल्ह्यांचा दौरा करून त्याबाबत सहा जिल्ह्यांतील वकिलांची एक बैठक घेऊन पुढील आंदोलनाला दिशा देणार आहे.
पुन्हा एन. डी. पाटील यांच्याशी चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुढील आठवड्यात भेट घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी दोन दिवसांत ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी सांगितले.