कोल्हापूर : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, याकरिता गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. ७ डिसेंबर) राजर्षी शाहू स्मारक भवन, मल्टिपर्पज हॉल येथे सायंकाळी पाच वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी, असा निर्णय बुधवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व नागरी कृती समितीतर्र्फे आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. गावडे होते.
अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, लोकांमध्ये खंडपीठ व्हावे, यासाठी जनजागृती व्हावी, याकरिता सर्वपक्षीय व्यापक बैठक व्हावी. नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटावे. त्यांच्याकडून याप्रश्नी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना खंडपीठ व्हावे, असे सुचवावे. जिल्ह्याचे दोन खासदार, आमदार, मंत्रिमहोदय यांना भेटून पुन्हा एकदा त्यांच्याकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी गळ घालावी, अशी सूचना त्यांनी मांडली.
महापौर सूरमंजिरी लाटकर म्हणाल्या, प्रथम नियोजित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिष्टमंडळाने भेटावे. त्यात काय निर्णय होतो, हे पाहावे. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवावी. त्यात मग काहीही होवो. त्यासाठी मीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे.बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गावडे म्हणाले, सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात आंदोलनाची दिशा ठरवावी. नियोजित मुख्यमंत्री, शरद पवार आणि मुख्य न्यायमूर्ती यांना भेटण्यासाठी स्वतंत्र शिष्टमंडळे तयार करावीत.
तत्पूर्वी अन्य उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या प्रश्नी न्यायालयाला घेरावो घालावा. नागरिकांना एकत्रित करून आंदोलन तीव्र करू. सहा जिल्ह्यांतील पक्षकारांचीही बैठक घेऊ. बार असोसिएशन व नागरी कृती समितीने ‘खंडपीठ’ मंजूर झाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. शासकीय यंत्रणा हडबडून जागी होईल, असे आंदोलन करू. एकसंध होऊन आंदोलन करू. वकील व पक्षकारांना रोखून धरल्याशिवाय न्यायालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याशिवाय न्यायव्यवस्थेकडून या प्रश्नाची दखलही घेतली जाणार नाही, आदी सूचना त्यांनी मांडल्या.
सर्वपक्षीय बैठकीपूर्वी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना भेटून आंदोलनाबद्दल मार्गदर्शन घेऊ, अशी सूचना माजी महापौर आर. के. पोवार यांनी केली. सोबतच १४ व १५ डिसेंबरला दोन्ही खासदार कोल्हापुरात आहेत. त्यांनाही संसदेत आवाज उठविण्यासाठी सांगू, असेही त्यांनी सुचविले. यास सर्वांनी अनुमती दिली. बार असोसिएशनचे सचिव अॅड. गुरुप्रसाद माळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अॅड. सपना हराळे यांनी आभार मानले.
यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत चिटणीस, अॅड. अजित मोहिते, अॅड. पंडित सडोलीकर, अॅड. वैभव काळे, अॅड. अतुल जाधव, अॅड. रमेश पाटील, खंडपीठ नागरिक कृती समितीचे बाबा पार्टे, प्रसाद जाधव, अशोक पोवार, फिरोजखान उस्ताद, संभाजीराव जगदाळे, रमेश मोरे, महादेव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.कोट घालून एकदा या !
- कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी उग्र प्रकारचे आंदोलन करून यंत्रणा खडबडून जागी केली पाहिजे. त्यात आमचा कोटही द्यायला तयार आहोत. यात तुम्हीसुद्धा कोट घालून एकदा त्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे वक्तव्य गोवा आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे यांनी केले.
- कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष आर. बी. गावडे व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे आणि कार्यकारिणी सदस्या शिल्पा सुतार यांच्या हस्ते बुधवारी त्यांचा फेटा बांधून व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
- कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष आर. बी. गावडे व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते बुधवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून अॅड. शिल्पा सुतार, अॅड. महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, अॅड. गुरुप्रसाद माळकर उपस्थित होते.
- कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे ‘खंडपीठ’ मागणीप्रश्नी कसबा बावडा येथील न्यायसंकुलात बुधवारी आयोजित बैठकीत बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आर. बी. गावडे. सोबत डावीकडून प्रसाद जाधव, दिलीप देसाई, बाबा पार्टे, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, आर. के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. गुरुप्रसाद माळकर, अॅड. विवेक घाटगे उपस्थित होते.