इचलकरंजी : येथील रमाई आवास घरकुल योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना स्वतंत्र शौचालय बांधून द्यावे. घरकुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करून त्वरित ताबा मिळवून द्यावा. तसेच याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, यासह अन्य मागण्यांसाठी लाभार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने नगरसेवक शशांक बावचकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी सहा वर्षे झाली अद्याप घरे मिळाली नाहीत, ही गंभीर बाब असून योजनेचे काम गतीने सुरू करून लवकर ताबा दिला जाईल, असे आश्वासन दिले.
शहरातील साईट नं. १०२ परिसरात रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण सहा इमारतींमध्ये १८१ लाभार्थ्यांना घरे बांधून दिली जाणार आहेत. या योजनेसाठी सन २०१४ साली पालिकेस २.८८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. २ जानेवारी २०१४ ला ठेकेदारास या कामाचा कार्यादेश दिला आहे. संबंधित ठेकेदारास तीन वेळा मुदतवाढ देऊनही बांधकाम आजतागायत पूर्ण झालेले नाही. लाभार्थी संघटनेचे अध्यक्ष सुखदेव माळकरी यांच्या नेतृत्वाखाली वारंवार पालिकेवर मोर्चे, आंदोलन व निवेदने दिली आहेत; पण इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेच नाही. त्यामुळे सोमवारी लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी ठेंगल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. ही योजना मंजूर होऊन सहा वर्षांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले नाही, ही खूप गंभीर बाब आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण करून लाभार्थ्यांना त्वरित ताबा मिळेल यासाठी प्रयत्न केले जाईल. तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. या वेळी शिष्टमंडळाने ३० सप्टेंबरपर्यंत ताबा देण्याची मागणी केली; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.