शेती हा व्यवसाय प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्ग नेहमीच साथ देईल, असे होत नाही. लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम होतो आणि यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना आधार देऊ शकते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राज्यात अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना २0१५-१६ या रब्बी हंगामासाठी राबविण्याचा ३१ आॅक्टोबरचा शासन निर्णय झाला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक साहाय्य देणे, शेतकऱ्याला उच्च पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंक कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामात बागायती गहू, जिरायत ज्वारी, हरभरा तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग पिके या योजनेखाली येतात. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत कुळासह कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच शेतीकरिता कर्ज उचललेले व कर्ज न उचललेले शेतकरी स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात. शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वत: त्यांचे विमा प्रस्ताव पेरणीनंतर एक महिन्यात किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबरपूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. एकूण कमाल विमा संरक्षण सरासरी उत्पन्नाच्या १५0 टक्केपर्यंत घेता येते. सर्वसाधारण जोखीमस्तर ६0 व ८0 टक्के असलेल्या अधिसूचित पिकांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभाग घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी विमा हप्त्यामध्ये १0 टक्के अनुदान ( केंद्र ५ टक्के व राज्य शासन ५ टक्के) मिळण्यास पात्र ठरतील. चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी बागायती गहू, जिरायत ज्वारी व हरभरा पिकांसाठी शेतकऱ्यांनी त्यांचे विमा प्रस्ताव पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. बँकांनी हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्यामध्ये किंवा ३१ जानेवारी २0१६ पर्यंत भारतीय कृषी विमा कंपनीस सादर करावयाचे आहेत. उन्हाळी भुईमुगाचे पीक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ मार्च २0१६ पर्यंत शेतकऱ्यांकडून प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून १ महिना किंवा ३0 एप्रिल २0१६ पर्यंत बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर होतील. रब्बी हंगाम २0१४ च्या पीक विम्यासाठी पीकनिहाय अधिसूचित मंडळे पुढीलप्रमाणे आहेत : रब्बी ज्वारीसाठी शिरोळ तालुक्यातील शिरोळ व नृसिंहवाडी महसूल मंडळ. बागायती गव्हासाठी हातकणंगले, शिरोळ, करवीर, गडहिंग्लज असे चार तालुके, हरभरा पिकासाठी हातकणंगले, करवीर, कागल, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा असे नऊ तालुके आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांच्याशी संपर्क साधावा. - वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याचीो
By admin | Published: November 17, 2015 12:12 AM