मुरगूड : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात येताना जपूनच यावे लागते. कारण कागलकर काय मागतील, कसे प्रेम करतील, हे सांगता येत नाही. या तालुक्यात नेता काय ठरवतो हे महत्त्वाचे नसून, येथील जनताच काय हवे ते ठरवते. म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्तम नमुना म्हणजे कागल तालुका आहे, असे गौरवोद्गार नूतन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले. मुरगूड (ता. कागल) येथील विश्वनाथराव पाटील खुल्या नाट्यगृहात सर्वपक्षीय सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नम्रता नामदेव भांदिगरे होत्या. यावेळी प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राजेखान जमादार, किरण गवाणकर, संतोष वंडकर, दगडू शेणवी, सुहास खराडे, विजय गोधडे, बाजीराव गोधडे, धनाजी गोधडे, आदी प्रमुख उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, आपण जेवढे सामाजिक कार्य केले आहे, त्यापेक्षा जास्त काम करणाऱ्या विद्वान व्यक्तींची संख्या प्रचंड आहे, पण तरी सुद्धा राष्ट्रपतींनी खासदार म्हणून माझी नियुक्ती केली. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराच्या पुण्याईवरच मला ही खासदारकी मिळाली आहे. खासदारकी मिळावी म्हणून मी कोणाच्या मागे गेलो नाही. शिवरायांच्या घराण्याचा सन्मान करावयाचा आहे, असा मोदींचा निरोप आपल्याला आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठीचे प्रयत्न, विदर्भ मराठवाड्यातील जाती जातीतील दरी कमी करण्याचा प्रयत्न यास कामाची पोहोच या खासदारकीमुळे आपल्याला मिळाली आहे. ते म्हणाले, फंड कुठे किती द्यावयाचा याबाबत धोरण ठरवणार आहे. म्हणून मुरगूडकरांना आपण विनंती करतो की राजाकडे मागताना किरकोळ मागू नका, आपण शिवरायांचे, शाहूंचे वंशज म्हणून राज्यसभेत गेलो आहे, मोदींसह अनेक मंत्र्यांची खास ओळख आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी प्रचंड निधी खेचून आणू. स्वागत, दलितमित्र एकनाथराव देशमुख यांनी केले. प्रास्ताविक बिद्रीचे संचालक राजेखान जमादार यांनी केले. धोंडिराम परीट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. श्रीकृष्ण देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, धोंडिराम परीट यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अविनाश चौगुले यांनी केले. आभार विजय गोंधडे यांनी मानले. अन् प्रोटोकॉल मोडला आपण ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी सर्व मंत्र्यांची ओळख करून घेण्यासाठी जात होतो. त्यावेळी माझी नियुक्ती नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीने झाली असताना विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद हे जाग्यावरून उठून उभा राहिले आणि म्हणाले की, शिवरायांचे, शाहूंचे वंशज कसे दिसतात हे बघण्यासाठी मी आज उभा आहे, हे त्यांचे कौतुकाचे शब्द कोल्हापूरकरांना अभिमानास्पद असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
लोकशाहीचा उत्तम नमुना म्हणजे कागल तालुका
By admin | Published: August 22, 2016 12:45 AM