कोल्हापूर : आता तरी ३३ गुण जुळलेत. आमचा आता साखरपुडा झालाय. लग्नही होवू शकतं अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्त आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे समन्वयक अविनाश अभ्यंकर यांनी ‘मनसे’ कोणासोबत युती करून पुढच्या निवडणुका लढणार का या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र याबाबत आमचे नेते राज ठाकरे हेच निर्णय घेतील हे सांगायलाही ते विसरले नाहीत.अभ्यंकर हे या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी दुपारी मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंकर बोलत होते.
ते म्हणाले, राज ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. यानंतर हाच संदेश तालुकापातळीवर जाईल. भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हा निर्णय असून राज यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हलू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावेळी राजू दिंर्डाले, प्रसाद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.