कोल्हापूर : आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील एका वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी हजारो रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याने अखेर कोल्हापूर बैतुलमाल कमिटी पुढे सरसावली आणि त्यांच्यावर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.मातोश्री वृध्दाश्रमातील या वृध्दाच्या अंत्य संस्कारासाठी मृतदेह पॅक करण्यासाठी आणि ॲम्ब्युलन्समधून नेण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. तेव्हा वृद्धाश्रमाचे संचालक पाटोळे कुटुंबीयांनी बैतूलमाल कमिटीचे सदस्य आणि नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांच्याशी संपर्क साधला.
अशा परिस्थितीत बैतूलमाल कमिटी अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावली. कमीटीचे सदस्य राजू नदाफ, युनूस शेख, समीर बागवान, सुलेमान शेख यांनी तत्काळ मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन मृतदेह रितसर पॅक केला आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या शववाहिकेतून या वृध्दावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले.पाटोळे कुटूंबियांनी मानले आभारकठीण परिस्थितीत बैतुलमाल कमिटी तातडीने मदतीला धावली. याबद्दल पाटोळे कुटुंबीयानी कोल्हापूर बैतुलमाल कमीटीचे जाफरबाबा, तौफिक मुल्लाणी तसेच ॲड. अभिजीत आडगुळे यांचे भावनिक होऊन आभार मानले. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध कोरोनाग्रस्त मृत होण्याची ही पहिलीच वेळ होती, अशा प्रसंगी इतर वृद्धावर मानसिक आघात होतो म्हणून तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली.