शिरोळ तालुक्यामधील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री यड्रावकर बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, डॉ. प्रसाद दातार, डॉ. पांडुरंग खटावकर प्रमुख उपस्थित होते.
मंत्री यड्रावकर म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंधाबाबतची नवीन नियमावली राज्य सरकारने केली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच कोविड सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचाराची व्यवस्था करावी. रेमडेसिवर व इतर अनुषंगिक औषधांसह ऑक्सिजनचा साठा करण्याच्या सूचनाही मंत्री यड्रावकर यांनी दिल्या.
तहसीदार डॉ. मोरे म्हणाल्या, ४५ वर्षांवरील जवळपास चार हजार नागरिकांना दररोज लस देण्याबाबतचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. त्याबाबतची यंत्रणाही तालुक्यात कार्यरत आहे. पण लसीचा तुटवडा भासत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मंत्री यड्रावकर यांनी लस उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अर्चना पाटील यांना दूरध्वनीवरून दिला.
शिरोळ व दत्तवाड येथे स्वॅब तपासणीसाठीचे नमुने घेतले जात आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींकडील तसेच नगरपरिषदेकडील सर्व स्वच्छता व आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना कोविड लसीचा डोस दिला असल्याची माहिती डॉ. दातार यांनी दिली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.