कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने फुकट्या प्रवाशांना आळा बसावा याकरिता २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर यादरम्यान कोल्हापूर विभागातील बारा आगारांतील पर्यवेक्षकांमार्फत प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविली आहे. आतापर्यंत विनातिकीट प्रवास करताना १५ जण सापडले आहेत. त्यांच्याकडून १३७० रुपयांचा दंड व ४८० रुपये प्रवासभाडे वसूल केले आहे. या मोहिमेंतर्गत ३७४३ बसच्या फेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, मलकापूर, शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी, जयसिंगपूर, राधानगरी, गगनबावडा, या तालुक्यांमध्ये आगारांतर्गत बसस्थानकासह मार्गावर पर्यवेक्षकामार्फत प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोटारवाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा शंभर रुपये यापैकी जी रक्कम अधिक आहे, असा दंड करण्यात आला. यात ३५ अधिकाऱ्यांकडून ३७४३ बसच्या फेऱ्या तपासण्यात आल्या. त्यातून १५ फुकट्या प्रवाशांकडून १३७० रुपयांचा दंड व ४८० रुपये प्रवास भाडे वसूल केले.
एकूण आगार - १२
एकूण पथके - ५ तपासणी पथके
तपासणी अधिकारी - ३५
तपासलेल्या बसच्या फेऱ्या - ३७४३
त्यापैकी ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या - २६४१
१३७० रुपयांचा दंड वसूल
- बारा आगारातील बसस्थानकासह मार्गावर पर्यवेक्षकांच्या पाच पथकांकडून तपासणी करण्यात आली.
- तपासणीअंतर्गत १५ फुकटे प्रवासी आढळले.
- फुकट्या प्रवाशांकडून १३७० रुपयांचा दंड व प्रवासभाडे म्हणून ४८० रुपये, असे १८५० रुपये वसूल करण्यात आले.
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्यास मोटार वाहन कायदा १९८८ नुसार त्याने चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल केली जाते.
कोट
प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. प्रवास सुरू झाल्यानंतर संपेपर्यंत आपली तिकिटे जपून ठेवावीत. तपासणी पर्यवेक्षक, अधिकारी यांना तिकीट दाखवून सहकार्य करावे. जेणेकरून दंड होणार नाही. याची काळजी प्रवाशांनी घ्यावी.
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, कोल्हापूर विभाग