लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही 'जैसे थे' आहे. शहरात अजूनही दररोज ४० ते ५० कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दररोज आढळणारे रुग्ण शहरवासीयांच्या चिंतेत भर पाडणारे आहे. प्रशासनाने नियमांमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. मात्र, शहरातून कोरोना गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी शहरातून कोरोना अद्याप गेलेला नाही, याची खबरदारी घेत वावरले पाहिजे; अन्यथा पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.
शहरात आढळणा-या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. मात्र, नागरिक व प्रशासनास कोणतेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी, तसेच व्यापा-यांनाही व्यापार करता यावा, यासाठी प्रशासनाने काही प्रमाणात सूट दिली आहे. परंतु नागरिक त्याचा गैरफायदा घेत विनामास्क व विनाकारण फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. शहरातील आठवडी बाजार कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या बाजारात नागरिकांची चाचणी केली असता अनेकजण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही.
राज्य शासनाने कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार एकूण पाच टप्पे केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अद्याप चौथ्याच टप्प्यात आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मंत्र्यांनी अजून निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोरोना महामारीतून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. सध्याच्या घडीला एकूण रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहचली असून, ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी काळजी करणारी आहे. तरीही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून अनेकजण बिनदिक्कतपणे फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी असेच बेजबाबदारपणे वागल्यास कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास वस्त्रनगरीस परवडणारे नाही.
चौकट
सर्वाधिक मृत्यूदर असलेला जिल्हा
राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती सुधारत असून, निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. त्याबरोबर इचलकरंजी शहराचाही मृत्यूदर सर्वाधिक आहे. यामुळे शहरावर निर्बंधाची टांगती तलवार कायम आहे.