लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : तब्बल सव्वातीन महिने विविध प्रकारची दुकाने बंद असल्याने खरेदी व दुरुस्ती थांबली होती. वशिलेबाजीतून चोरी-छुपे पद्धतीने काहींची कामे झाली; परंतु रीतसर परवानगी मिळाल्याने कोरोना संपला की काय, अशा अविर्भावात अनेकजण खरेदीला बाहेर पडले. परंतु ही गर्दी अतिशय धोकादायक असून, यातून संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू होईल, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध नियम घालून दिले आहेत. त्यातील प्रमुख त्रिसूत्रीचा वापर केल्यास धोका टळू शकतो.
मोबाईलद्वारे प्रत्येक कॉलला सूचना दिली जाते. अत्यावश्यक काम असेल, तरच बाहेर पडा; अन्यथा घरातच सुरक्षित राहा. बाहेर पडल्यास मास्क व सोशल डिस्टन्सचा वापर करा. वेळोवेळी हात धुवा, या सूचनांचा अवलंब करणे दुकानदार व ग्राहक दोघांनाही अत्यावश्यक आहे.
व्यवसाय बंद आहे म्हणून आतताईपणा करत ग्राहकांची झुंबड अंगावर घेऊन पडण्यात शहाणपण नाही; अन्यथा केलेली मिळकत औषधोपचारात खर्ची पडू शकते. तसेच ग्राहकांनीही गर्दीचा अंदाज घेत सुरक्षितपणे आवश्यक असेल तीच खरेदी करणे गरजेचे आहे.
किरकोळ चुकीमुळे धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
चौकटी
नियमांची पायमल्ली
शहरातील अनेक दुकानांमध्ये सर्रास नियम पायदळी तुडविले जात होते. मास्क हनुवटीला, सोशल डिस्टन्सचा फज्जा, सॅनिटायझर नावालाच. त्यातून नियम सांगणारा एखादा आलाच, तर त्याला तीन महिन्याने आता दुकान उघडले आहे. थोडातरी धंदा करू द्या की, असे उलट उत्तरही दिले जात होते. नियम आपल्यासाठीच आहेत, याचा विसर पडल्याचे दिसून आले.
काहींची सहपरिवार गर्दी
काही नागरिकांनी धोकादायक परिस्थितीचा विचार न करता आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन सहपरिवार खरेदीचा आनंद लुटला. चप्पल दुकानातही रांग लावून खरेदी सुरू होती.
फोटो ओळी
१९०७२०२१-आयसीएच-०९
दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने मुख्य मार्गावर झालेली गर्दी.