जयसिंगपूर : शहरात रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाच्या पावतीला सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, शौचास जाणे किंवा थुंकणेही आता महागात पडणार आहे. शासनाने सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार नगरपालिकांना दिले आहेत. त्याबाबत जयसिंगपूर पालिकेनेही आपले धोरण जाहीर केले आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जयसिंगपूर पालिकेने कंबर कसली आहे. शहरात स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय वासुदेवाची स्वारी व पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. शहरात स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले जात आहेत. त्यातच आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारने नवीन कायदा तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण केल्यास पोलीस व आरटीओप्रमाणे थेट दंड आकारण्याचे अधिकार पालिकेला दिले आहेत. तसा अध्यादेश जयसिंगपूर पालिकेला आला आहे. त्याप्रमाणे पालिकेने शासन निर्णयाप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्वच्छतेचे पालन न करणाºया व्यक्ती व संस्था यांच्यावर दंडात्मक कारवाईचे धोरण निश्चित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, उपद्रव होऊ शकेल असे टाकाऊ पदार्थ टाकणे, त्यामुळे अस्वच्छता करणाºयास दंड होणार आहे. कचरा टाकणाºयास जागेवरच दंडाची पावती दिली जाणार आहे. स्वच्छतेबाबत कोणत्याही कारणामुळे एखाद्याला आॅन दि स्पॉट पकडले तर त्याचक्षणी त्याला दंडाची पावती देण्याची तरतूद केली आहे. दंड करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक बारा प्रभागांत फिरेल, असे नियोजन करण्यात येणार आहे.आरोग्य विभाग : नागरिकांना आवाहनस्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शासनाने ३० डिसेंबरला नवीन अध्यादेश घोषित केला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबत सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर घाण करणाºयांवर दंडात्मक कारवाईचे धोरण राबविले जाणार आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी शहरवासीयांतून व्हावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सावधान... रस्त्यावर घाण केल्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:49 AM