शासकीय खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबविण्याचा एक प्रघात आहे. प्रशासन गतिमान करणे, नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, त्यांच्या हिताचे रक्षण करणे, चांगली सुरक्षा देणे असे विविध हेतू त्यामागे असतात. काही ठिकाणी अशा संकल्पना यशस्वी होतात, तर काही ठिकाणी त्या अयशस्वी ठरल्याने अल्पजिवी ठरतात. प्रत्येक अडीच-तीन वर्षांनी अधिकारी येतात आणि अशा संकल्पना पुढे येतात. अधिकारी बदली होऊन गेला की मग त्या संकल्पना मागे पडतात किंवा बंद केल्या जातात. त्यामुळे ‘नवीन अधिकारी, नवीन संकल्पना’ हा प्रघातच पडलेला आहे. कोल्हापूरकरांनी असे प्रयोग यापूर्वी अनेकवेळा पाहिले आहेत. खरंतर एखाद्या अधिकाऱ्याने चांगली योजना सुरू केली असेल आणि त्यांचे चांगले परिणाम मिळत असतील तर पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यानेही ती संकल्पा राबविली पाहिजे; पण दुर्दैवाने तसे होताना पाहायला मिळत नाही म्हणूनच चांगल्या योजनाही गुंडाळल्या जातात, हाही अनुभव आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या या अफलातून योजनांची आठवण यायचे आणि त्यावर चर्चा होण्याचे कारण म्हणजे सोमवारी पोलीस दलाने सुरू केलेला ‘सायकल बंदोबस्त’ही आणखी एक अफलातून योजना! पोलीस आता सायकलवरून बंदोबस्त करणार आहेत. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, चेन स्नॅचिंग, गुंडागर्दी, गर्दी, मारामारी अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नव्हती. कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा तसा दावा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात घरफोडीचे सत्र सुरू आहे. शेकडो बंद घरे चोरट्यांनी फोडली, लाखोंचा मुद्देमाल लुटला. आता तर चोरट्यांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारत शेजारच्या खेडेगावांकडेही मोर्चा वळविला आहे. अजूनही चोऱ्या होतच आहेत. आपल्या घराला कुलूप लावून दोन-चार दिवस बाहेरगावी जायलाच काय तर बाजारात जायला सुद्धा लोक घाबरत आहेत. कारण दिवसाची वेळ सुद्धा चोरट्यांनी अचूकपणे साधलेली आहे. गेल्या दोन महिन्यांत इतक्या चोऱ्या झाल्या; पण एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. शहरात महापालिकेने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पोलिसांकडे गतीने पळणारी चारचाकी वाहने आहेत. मोटारसायकली आहेत. पोलिसांची दिवसाचीच नाही, तर रात्रीचीही गस्त सुरू आहे. तरीही चोर सापडत नाहीत. त्यामुळेच नवीन प्रयोग आशादायी वाटतो. बिचारे पोलीस सायकलवरून गेल्यावर तरी चोरटे सापडतील, अशी अपेक्षा आहे. महिलांच्या गळ्यातील गंठण किंवा सोन्याचे दागिने हिसकावल्यानंतर क्षणात ‘धूम स्टाईल’ने वेगाने निघून जाणारे चोरटे आपल्या पोलिसांना सायकलवरून पाठलाग करून पकडता येतील. तमाम कोल्हापूरकरांनीही तशा ‘बावळट’ आणि ‘भाबडी’ आशा बाळगायला काहीच हरकत नाही. आता सायकलवरून पोलीस गस्त घालणार असल्यामुळे नागरिकांनी आता खुश्शाल घरांना कुलूपं लावून चार-पाच दिवसांसाठी बाहेरगावी पर्यटनाला जावे. महिलांनी अंगावर दागिने घालून रस्त्यावरून बिनधास्त फिरावे. कारण आता घरफोड्या होणार नाहीत. दागिने हिसकावण्याचे प्रकार घडणार नाहीत. पोलीस रात्रं-दिवस बंदोबस्ताला असतील. ज्यांनी कोणी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय घेतला त्यांचे कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या बुद्धिमत्तेलाही दाद द्यायला पाहिजे. सात पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सायकल बंदोबस्त योजनेत सहभागी पोलीस मित्रांना माझी एक विनंती आहे. आधीच तुमच्यावर कामाचा अतिरिक्त भार आहे. बंदोबस्ताचा ताण-तणाव आहे. वेळेवर खाणं होत नाही. रात्रीची झोप पूर्ण होत नाही. सणवाराच्या दिवशीच काय इतर दिवशीही सुट्या मिळत नाहीत. साप्ताहिक सुटीच्या दिवशीच कोणी तरी व्हीआयपी आले की झक मारत कामावर जावे लागते. त्यामुळे कोणाला बी. पी.चा त्रास असेल. कोणाला शुगरचा त्रास होत असेल. गुडघे दुखत असतील. वयोमानानुसार सायकल चालविता येत नसले, तर आधी तुमची स्वत:ची काळजी घ्या. सायकल काय हे साहेब आहेत, तोवर चालवायचीच आहे. - भारत चव्हाण
‘भाबडा’ बंदोबस्त-
By admin | Published: June 13, 2017 12:04 AM