लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्तिपर गीते आणि उपस्थितांचा श्वास रोखून धरणारा थरार अशा चैतन्यमयी वातावरणात गंगावेशीतील भाऊ नाईक गल्ली सांस्कृतिक मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान दुसºयांदा राशिवडेच्या रासलिंग गोविंद पथकास बुधवारी रात्री मिळाला.या उत्सवासाठी रासलिंग गोविंदा पथक (राशिवडे),गोडीविहीर, अजिंक्यतारा गोविंदा पथक (दोघेही शिरोळ) यांनी नोंदणी केली होती. रात्री साडेदहापर्यंत एकही पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी आले नव्हते. अखेर रात्री १०.४०च्या सुमारास रासलिंग गोविंदा पथक दाखल झाले. यावेळी या पथकाने पहिला प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दुसºया प्रयत्नात ‘रासलिंग’च्या गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली. त्यामुळे यंदाचा दहीहंडी फोडण्याचा मान राशिवडेच्या रासलिंग पथकास मिळाला. या पथकास २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यंदाचे आकर्षण ठरलेल्या मुंबईच्या नटराज गु्रपच्या कलाकारांनी प्रथम देशभक्तिपर गीते सादर केली. यासह लावणी, दहीहंडी गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. आसपासच्या परिसरातील अनेक इमारतींवरूनही अनेकांनी दहीहंडी पाहण्याचा आनंद घेतला. दहीहंडीचे पूजन विवेक महाडिक, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निरंजन हुंडेकरी, राजेंद्र चव्हाण, अमोल गायकवाड, राहुल ससे, संभाजी भोसले, चेतन काळे, विक्रम खोत, तुषार दळवी, आदी उपस्थित होते.
‘भाऊ नाईक’च्या दहीहंडीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:27 AM