भाळवणी : दफ्तराच्या ओझ्याने चिमुकल्यांचा जीव टांगणीला लागला असतानाच, भाळवणी (ता. खानापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने ‘दफ्तर ओझ्याविना शिक्षण’ हा उपक्रम राबविल्याने प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांच्या हातात आधुनिक टॅबलेट आला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ. नूरजहॉँ राजुद्दीन मुल्ला यांच्या प्रयत्नातून व लोकसहभागातून सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा निधी जमा करून हा उपक्रम राबविला आहे.सध्या दफ्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असतानाच, भाळवणी शाळेतील शिक्षिका सौ. मुल्ला यांच्या प्रयत्नातून दफ्तर ओझ्याविना शिक्षणाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. सौ. मुल्ला यांनी स्वत: २० ते २५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यानंतर पालक व ग्रामस्थांच्या मदतीचे हातही पुढे आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नामदेव माळी, सरपंच अलका शिंदे, उपसरपंच मोहन धनवडे, गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, विस्तार अधिकारी विकास राजे, केंद्रप्रमुख नानासाहेब कांबळे, राजाराम शिंदे, धनंजय वाघ, प्रतापराव घोरपडे, महेश घोरपडे, सयाजीराव धनवडे, दीपक माळी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन लाखात उपक्रमअवघ्या पंधरा ते वीस दिवसात सुमारे तीन लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. चिमुकल्यांना टॅबलेट देऊन ज्ञानरचनावादमय व डिजिटल वर्ग तयार केला आहे. विविध शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून ज्ञानरचनावादानुसार अध्ययन करतानाच तंत्रज्ञानाचाही उपयोग अध्ययनात प्रभावीपणे करताना चिमुकली दिसत आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल बाबर, सभापती वैशाली माळी यांच्याहस्ते करण्यात आले.
भाळवणीत ‘दफ्तर ओझ्याविना शिक्षण’
By admin | Published: January 05, 2016 11:30 PM