अॅड. धैर्यशील सुतार यांची माहिती
कुरुंदवाड : शहरातील भालचंद्र थिएटरसह इतर ऐतिहासिक वास्तू वारसा वास्तू म्हणून लवकरच घोषित होणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेली जिल्हा वारसा संवर्धन समिती याबाबत लवकरच कार्यवाही करणार आहे अशी माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
काही वर्षांपूर्वी कुरुंदवाड नगरपरिषदेने शहरातील मध्यवर्ती भागात असलेली भालचंद्र टॉकीजची ऐतिहासिक वास्तू पाडून व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु शहरातील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी न्यायालयाने इमारत पाडण्यास पालिकेला मनाई केली होती. जिल्हा वारसा वास्तू संवर्धन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील एकूण १४० वास्तू या ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित होणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये कुरुंदवाड शहरातील भालचंद्र थिएटरचा समावेश आहे. या वास्तूंची यादी लवकरच जाहीर होऊन त्यावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.
जिल्हा वारसा समितीने हा लवकरच निर्णय घेतल्यास शहरातील ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्याच्यादृष्टीने मोठे पाऊल पडणार असल्याचे अॅड. सुतार यांनी पत्रकात म्हटले आहे.