संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चेंबूर येथील दोन एकरांत पसरलेला आर. के. स्टुडिओ विकण्याचा मनोदय कपूर घराण्याच्या वारसांनी जाहीर केला आहे. यामुळे स्टुडिओशी संबंंधित स्मृती जाग्या झाल्या आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी मेहनताना म्हणून दिलेल्या रकमेतूनच राज कपूर यांचा हा स्टुडिओ उभारण्यात आला आहे.१९४0 च्या सुमारास राज कपूर यांनी मुंबईत हा स्टुडिओ उभारला. कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओमध्ये ‘वाल्मीकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण भालजीबाबा करीत होते. यात राज कपूर आणि त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरही काम करीत होते. अवघ्या सोळा वर्षांचे राज कपूर यांनी यात नारदाची छोटी भूमिका केली होती. राज यांच्या भूमिकेची पोचपावती म्हणून भालजींनी तेव्हा तब्बल पाच हजार रुपये रोखीने दिले होते. त्याकाळी ही रक्कम प्रचंडच होती. हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे राज ही रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करत होते. बाबांना ते मामाजी म्हणत. त्यांना राज यांनी तसे सांगितलेही; परंतु दिलेले दान कधीही परत न घेण्याच्या बाबांच्या निर्धारामुळे पृथ्वीराज यांनी मुलाला ती रक्कम घेण्यास सांगितले.१९४0 मध्ये राज कपूर यांनी पुढे याच रकमेतून आर. के. स्टुडिओची उभारणी केली. भालजी ज्यांना दैवत मानत त्या शिवरायांचा भगवा ध्वज आठवण म्हणून राज यांनी त्यांच्या हयातीत स्टुडिओवर फडकता ठेवत आपले ऋण व्यक्त केले होते. भालजी पेंढारकर मुंबईत जेव्हा जेव्हा असत, तेव्हा तेव्हा भगवा फडकत असे. यामुळे ते मुंबईत असल्याचेही समजे. कपूर घराण्यातील कोणीही कोल्हापूरला आले, तर आजही ते अंबाबाईच्या दर्शनासोबत जयप्रभा स्टुडिओचीही माती कपाळाला लावतात.सध्या रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे या स्टुडिओचे कामकाज पाहतात. सप्टेंबरमध्ये रिअॅलिटी शोदरम्यान या स्टुडिओतील एक स्टेज जळला. त्यानंतर स्टुडिओ विकण्याचा मनोदय कपूर घराण्याने व्यक्त केला आहे. मात्र, याबद्दल राज कपूर प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.महसूल विभागाकडून शोधआर. के. स्टुडिओच्या प्रॉपर्टीकार्डावर भालजी पेंढारकर यांचेही नाव असल्याचे समजते. मात्र, याला दुजोरा मिळालेला नाही. यासंदर्भात महसूल विभाग शहानिशा करीत आहे.जयप्रभा, शालिनीस्टुडिओसाठी आंदोलनभालजी पेंढारकर यांनीच उभारलेला जयप्रभा स्टुडिओ हा मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीच्या मानाचा साक्षीदार आहे.स्टुडिओ जळाल्यानंतर भालजींनी तो लतादीदींना दिला. पांढरा हत्ती म्हणून लतादीदींनी तो विकासकाला विकण्याचा प्रयत्न केला;परंतु कोल्हापुरात त्याविरोधात आंदोलन झाले.न्यायालयाने ही खासगी मालमत्ता असल्याचे सांगितल्यानंतर या जागेवर जयप्रभाच्या अस्तित्वाच्या काही खुणा सोडून आता खासगी इमारत उभी आहे. हीच गोष्ट शालिनी स्टुडिओबाबत आहे. याचा लढा अद्याप सुरू आहे.
भालजींच्या मेहनतानातून उभारला आर. के. स्टुडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:59 PM