कोल्हापूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील धनपाल निंगाप्पा भमाणे व सदाशिव धनपाल भमाणे यांच्याकडे बेकायदा सहा करारपत्रे व जमिनीचे २१ लाख किमतीचे ९ दस्त सापडले आहेत. सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी छापा टाकल्यानंतर हे उघड झाले असून, त्याची खातरजमा करून आज संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत.धनपाल भमाणे, सदाशिव भमाणे व अजित आम्माण्णा गोरवाडे (टाकळीवाडी) हे सावकारी करत असल्याच्या तक्रारी सुशिला श्रीपाल गोरवाडे व वैशाली बाबासाहेब गोरवाडे यांनी सहकार विभागाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकाने सकाळी भमाणे व गोरवाडे यांच्या घरावर छापे टाकले. अजित गाेरवाडे यांचे घर बंद आढळून आले, ते दक्षिण भारत सहलीसाठी गेल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितल्याने अधिकाऱ्यांनी त्यांचे घर सील केले. धनपाल भमाणे, सदाशिव भमाणे यांच्याकडे ५० व १०० रुपयांचे स्टॅम्पपेपर वरील करारपत्रे सहा, जमीन खरेदीच्या अनुषंगाने झालेली २१ लाखांची खरेदीपत्रे नऊ व रोख रक्कम आढळून आली आहे. या सर्वांचा पंचनामा झाला असून, खातरजमा केल्यानंतर संबंधितांवर गु्न्हे दाखल होणार आहेत. पथकामध्ये आर. जी. कुलकर्णी, शैलेश शिंदे, संतोष कांबळे, जे. एन. बंडगर, व्ही. व्ही. वाघमारे, पी. व्ही. फडणीस, अजित गोसावी, पांडुरंग खोत यांचा सहभाग होता.भमाणे यांच्याकडे हे सापडले :५०,१० रुपयांच्या स्टॅम्पपेपर वरील करारपत्रे सहाखरेदीपत्रे :१ हेक्टर जमिनीचा ९ लाखांचा व्यवहार.१ हेक्टर २० गुंठे जमिनीचा ७ लाख १५ हजारांचा व्यवहार.१ हेक्टर १८ गुंठे जमिनीचा ४ लाख ५० हजारांचा व्यवहार.१ गुंठ्यातील बांधलेल्या मिळकतीचा १ लाख ३० हजारांचा व्यवहारभमाणे यांचा मेंढपाळ व्यवसायधनपाल व सदाशिव भमाणे यांचा मेंढपाळ व्यवसाय असल्याचे दाखवले आहे. त्यांनी केलेल्या करारपत्र व खरेदीपत्रातील रक्कमा पाहता, अत्यंत कमी रक्कमेत शेती खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.
कोल्हापुरातील टाकळीवाडीत सहकार विभागाने टाकला छापा, २१ लाखांचे बेकायदा दस्त सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:59 PM