लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. सौद्यावेळी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यावर कारवाई केली जाते.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सगळीकडेच निर्बंध आणले जात आहेत. मात्र शेतीमाल विक्री कायम ठेवली असून तिथे गर्दी होऊ नये यासाठी पणन संचालकांनी बाजार समित्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सौद्याच्या वेळी गर्दी होऊ नये, मास्क शिवाय बाजार समिती परिसरात कोणाला प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. चार भरारी पथकांची नेमणूक केली असून सौद्यावेळी पथक संबंधित घटकांवर नजर ठेवून राहणार आहे. कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशनचे मनोहर चूग, अशोक मोटूमल यांनी सर्व घटकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. बाजार समितीच्या वतीने प्रबोधन सुरू असून शुक्रवारी भाजीपाला व फळे तर रविवारी कांदा-बटाटा, गुळ मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहीती बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिली.
समितीतील घटकांना लसीकरण बंधनकारक
बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी, अडते, खरेदीदार, हमालांना लसीकरण करणे बंधनकारक आहे. यासाठी समितीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी समिती प्रशासनाने केली आहे.