कोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) विरोधात दि. २६ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ आणि ‘देशव्यापी चक्का जाम’ करण्याची घोषणा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) राष्ट्रीय व्यापार संमेलनात नागपूर येथे झाली. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी संयुक्तपणे या आंदोलनाची घोषणा केली.
या संमेलनास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, प्रशांत शिंदे, विजय नारायणपुरे उपस्थित होते. भारतीया आणि खंडेलवाल यांनी जीएसटी कौन्सिलच्या फायद्यासाठी जीएसटीचे स्वरूप विकृत केल्याचा आरोप केला. जीएसटीच्या सद्यस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांत ९३७ हून अधिक दुरुस्तीनंतर जीएसटीची मूलभूत रचना बदलली आहे. वारंवार आवाहन करूनही जीएसटी कौन्सिलने अद्याप कॅटने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेतली नाही. त्यामुळेच देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत आपले मत पोहोचवण्यासाठी कॅटने या आंदोलनाची घोषणा केली असल्याचे भारतीया आणि खंडेलवाल यांनी सांगितले. त्याला पाठिंबा दर्शवित ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देशव्यापी चक्काजामची घोषणा केली. या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि त्यांच्या संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’च्यावतीने अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.