लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांची देशभरात निघालेली भारत जोडो यात्रा केंद्रातील भाजपचे भ्रष्ट सरकार नष्ट करेल, असा घणाघात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटी आश्वासने देत दिशाभूल करीत आहेत. यामुळे ते वचनभ्रष्ट झाल्याची टीकाही त्यांनी केली. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील दसरा चौकात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कँाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांची प्रमुख उपस्थितीत होते.
पाटील म्हणाले की, भाजपने देशातील प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगार देवू असे सांगितले होते. पण ते सत्तेवर आल्यानंतर पंधरा लाख दिले नाहीत. दोन कोटी उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे मोदींची प्रतिमा वचनभ्रष्ट अशी झाली आहे. भाजप सत्तेचा वापर करून विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का पोहचवत आहे. यामुळेच काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेमुळे राहूल गांधी यांची प्रतिमा उजळली आहे. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पण भारत जोडो यात्रेने त्याला सडेतोड प्रत्युतर दिले आहे. ते चांगलं कांहीतरी घडवतील हा विश्र्वास जनतेच्या मनांत तयार होवू लागला आहे हेच यात्रेचे फलित आहे.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रचंड प्रतिसादामुळे भारत जोडो यात्रेची नोंद गिनिज बुकमध्ये होईल. यात्रेची दखल जागतिक पातळीवरही घेतली जात आहे.
माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या जोरावर समाजात दुफळी माजवत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक आणला तेव्हा नांवे ठेवणारे आता त्याच संगणकाच्या माध्यमातून द्वेषाचे राजकारण पसरवत आहेत. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचत असल्यानेच राहूल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. कोल्हापूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असून जिल्ह्यातील सामान्य माणूस यापुढेही काँग्रेसच्या विचारांसोबत राहील. या यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस कमिटीत नोंदणी करावी.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला वैभवशाली इतिहास आहे. पण सातत्याने चुकीचा प्रचार करून भाजप सत्तेवर आली. त्यांच्या सरकारमध्ये एकाही घटकाला न्याय मिळालेला नाही. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी संकटात आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे.
पदयात्रेने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांच्यासह सर्वच नेत्यांनी सिध्दार्थ नगरातील राजर्षी शाहू समाधी स्थळास भेट दिली व अभिवादन केले. तेथून पदयात्रेने ते मेळाव्याच्या ठिकाणी आले.
एलईडी वाहन गावागावात जाणार- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा दाखवण्यासाठी खास वाहन तयार केले आहे. ही वाहने सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सात या वेळेत गावागावात जातील. यामाध्यमातून यात्रा तळागाळापर्यंत पोहचेल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.